मराठवाडा मुक्ती संग्रामात उमरगा तालुक्यातील नाईचाकूर गावच्या क्रांतिकरांचा मोठा संघर्ष
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन विशेष लेखन -डॉ. प्रा .हणमंत पवार नाईचाकूर
नाईचाकुर/प्रतिनिधी गुणवंत पवार :- निजाम राजवटीतील नाईचाकूर एक महत्त्वाचं गाव. गावात पोलीस ठाणं. इथून निजामाच्या आजूबाजूच्या ऐंशी गावाचा कारभार चालायचा. जेव्हा हैद्राबाद निजामाच्या अत्याचारी राजवटी विरोधात परिसरातील लोकांनी आंदोलन उभारले, तेव्हा येथील पोलीस ठाण्याचा आमीन म्हणजेच फौजदार होता 'शैदोद्दीन पठाण.' तो लई दिसापासून आपल्या लाडक्या घरवाली 'बुबू' सह गावातच मराठा समाजाच्या प्रेमनाथ पवार यांच्या वाड्यात राहायचा. ठाण्याचा जमादार 'रहेमान' भवानी कोळ्याच्या वाड्यात तर पोलीस शिपाई 'बरकंदाज अब्दुल सत्तार' पोलीस ठाण्यातच राहत असे. पोलीस ठाणं जरी निजामाच असलं तरीबी गावात मुस्लिम अल्पसंख्यांक. त्यामुळे फौजदार पठाण साहेबचा वागणं जरा सबुरीचच होतं.
आमीन साहेबांची बायको 'बुबू' अत्यंत निर्मळ, सोज्वळ स्त्री. ती मुस्लिम अन आजुबाजूला सारी हिंदूंची घरं. तिचा सारा वावर हिंदू घरांमधी. ती साऱ्या गावाची भाभी होती. कुणी भाभीला परकं मानत नव्हतं. ईद सणाचा आनंद साजरा करायला गावातील सर्व हिंदू बायका बुबू भाभीकडं जायच्या. बुबू भाभीही आपल्या या सख्यांना आग्रह करू करू शीरखुर्मा द्यायची. तर नागपंचमीला बूबू भाभीनं हिंदूंच्या बायांसह फेर धरलेला असायचा. ती हिंदूंच्या बायाबरोबर भुलईची गाणी गुणगुणायची. एकंदरीत बुबू गावची 'भाभी' कधी झाली कुणालाच कळालं नाही. तसं पाहायला गेलं तर बुबू गावच्या आमीन साहेबांची बायको. त्याकाळात आमीन अर्थात फौजदार साधंसुधं पद नव्हतं. त्याचा एक वेगळा रुबाब, दरारा होता. गावावर वचक असायचा. तेव्हा बुबूलाही सायबीनीच्या थाटात राहणं काही अवघड नव्हतं; पण बुबूचा स्वभाव अत्यंत नम्र, बोलका. तिच्या अंगी सायबीनीपणाचा थोडाही अहंकार नव्हता.
प्रेमनाथ पवाराच्या वाड्याला लागून भीमराव मान्याचं घर. बुबू भाभी व या घराचा लयी जिव्हाळा. बुबू व मान्याची आक्का एकमेकींना सोडून राहायच्या नाहीत. बुबू मान्याच्या आक्काकडं यायची अन् घरातल्या सारखं वावरायची. अक्काला म्हणायची, "आक्का, आज क्या सब्जी करी है ?"
आक्का, "आमच्यात काय नवीन असतंय माय. तेच कधी सांडगा, पिठलं, नायतर वरण. आज हरभऱ्याचा गरगटा केलाय."बुबू, "हमारे साब को तूमारे हात का गरगटा बहोत अच्छा लगताय."आक्का, "मला माहीत हाय माय, मनून तर बक्कळ केलेवं. मी यंका बरूबर कोरड्यास देनारच हुते."
बुबू, "मुझको मालूम है। पर अब मै आयी हूं। तो मईच लेकि जाती हू।" बुबू अन् अक्काचा या ना त्या कारणानं असा संवाद दररोज चालायचा. दुपारच्या वक्ताला बुबू भाभी मान्याच्या अक्काकडे सहज बोलायला म्हणून यायची अन् सांगायची,
“आज हमारे साब को उपर से खबर आयी है। वो कह रहे थे, इधर कुछ लोग सल्तनत के विरोध में हलबली मचा रहे हैं। उनकी जांच पडताल करने के वास्ते कोई ऊपर के साब आने वाले है।"झालं बोलता-बोलता बुबू भाभी खबर देऊन जायची अन् ती खबर व्यंकू मान्याकडून गावातील स्वातंत्र्य आंदोलनासाठी पेटलेल्या पोरांना कळायची. पोरं सावध होऊन गावातून कधी पोबारा व्हायचे, हे कुणाला कळायचंबी नाही. कधी सहज तर कधी जाणून बुजून बूबूभाभीनी दिलेली खबर पोरांना संजीवनीच वाटायची. मातृभूमीसाठी लढणाऱ्या या पोरांच्या मनात बुबू भाभीनं एक आदराचं स्थान निर्माण केलं. म्हणूनच या पोरांना बुबू भाभी आमीन साहेबांची पत्नी असूनही आपल्यासाठी कार्य करणाऱ्यांची मदतगार वाटायची.
१९४८ ला संपूर्ण हैदराबाद संस्थानात स्वातंत्र्याचे वारे जोराने वाहू लागले. गावच्या गावं निजामाच्या विरोधात आवाज उठवू लागली तर दुसरीकडे निजामाची रझाकरी सेना आपल्या दडपशाहीने लोकांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करू लागली. निजामाच्या अन्याय अत्याचाराने येथील सामान्य जनता वैतागली विशेषता संस्थानातील हिंदूंना रजाकारांनी त्रास द्यायला सुरुवात केला. जो कोणी निजामाच्या विरोधात आवाज उठवलेला दिसला की त्याचं जीणं मुस्कील केलं जाऊ लागलं. गावागावातील युवकांचा विरोध बघून निजामाने आदेश काढला की, आपापल्या ठाण्याच्या हद्दीतील सामान्य लोकांकडून त्यांच्याजवळ असणारी सर्व हत्यारे जप्त करा. नाईचाकुर पोलीस ठाण्यातील फौजदार व शिपायांनी निजामाचा आदेश शिरोधार्थ मानून सामान्य लोकाकडील सर्व हत्यारे ठाण्यात जमा केली गेली.
मातृभूमीच्या मुक्तीसाठी लढणाऱ्या ह्या पोरांना जेव्हा समजलं की, हे सर्व हत्यारे मागच्या दाराने रझाकाराला देण्यात येणार आहेत तेव्हा पोरांची डोकी फिरली. त्यांनी हत्यारे लुटण्याचा निर्धार केला. यामध्ये शाहूराज जाधव, गोविंद पवार, नामदेव कॅप्टन, राम बापू पवार, किसन आबा पवार, नाभीराज जमालपूरे, तुळशीराम होगाडी,नामदेव कॅप्टन, सदानंद सुतार,सोपान माने ,चिरेवाडीचा वाघमोडे, कवठ्याचे धोंडीराम सोनवणे, हडोळीचे मोहनराव पाटील, मातोळचे दत्तोबा भोसले यांनी नाईचाकूरच्या ठाण्यावर हमला करण्याचे नियोजन केले.प्रत्येकाकडं जिम्मेदारी सोपवली गेली.
16 जानेवारी 1948. वेळामावस्येच्या दुसऱ्या दिवशी नाईचाकूरच्या माळावरच्या आईची जत्रा. सगळीकडं जत्रेचा माहौल. गावात तमाशाची बारी आलेली. लोक जत्रेत गुंग. पोरांच्या डोक्यात वेगळाच तमाशा घोळलालेला. ठाण्यावर हमला करून हत्यारे लुटण्याच नियोजन चाललेल. अंधाऱ्या राती या पोरांच्या डोक्यात स्वातंत्र्याचा दिवा पेटलेला. मोजक्या साथीदारासह गोविंद पवार ठाण्यावर पोहचले. बघतो तर काय ? ठाण्यात पहाऱ्यावर असणारा एकमेव पोलीस. तो ही आपली बंदुक बाजूला ठेवून बसल्या जागीच पेंगू लागलेला. गोविंद पवारने आपल्या बंदुकीचा बार उडीवला परंतु तेवढ्यात तो पोलीस जागी झाला अन परिस्थिती ओळखून मागच्या भिंतीवरून उडी टाकून अमीन सायबाच्या घराकडे पळाला. पुन्हा बंदुकीचे आवाज केले गेले. 'भारत माता की जय, 'महात्मा गांधी की जय, 'स्वामी रामानंद तीर्थ की जय'अशा गर्जना करत सर्व तरूण पोरं ठाण्यात घुसले. लक्ष्मण वाघमोडे घण घेऊनच हजर होता. त्यांनी एका ठोक्यातच कुलुप तोडलं. ठाण्यातील सर्व हत्यारे लुटली गेली. गोविंद पवारने ठाण्याला आग लावली.अन पोर सर्व हत्यारे घेऊन वागदरी कॅम्प कडे निसटली. इकडं आमीन साहेबांना खबर कळाली तेव्हा ते आपली बंदूक सावरीत घराबाहेर आले; परंतु रामा गायकवाड सह स्वातंत्र्य योध्दाची एक टोळी हत्यारासह त्यांच्या घरासमोर उभी. त्यांनी हवेत बंदुकीचा बार उडविला. घाबरून आमीन साहेब घरात घुसले. निरोप दयायला आलेला पोलीस ही अंधारात कुठे पळाला कुणालाच कळाले नाही. तसा आमीन रांगडा माणूस. आपल्या पत्नीप्रमाणं तेही आपला हुद्दा विसरून गावात एकरूप झालेले; पण आपल्या कर्तव्याप्रती प्रती ते तेवढेच जागरूक होते. म्हणून तर गाव त्यांना वचकून असायचा. आज त्यांच्याच आधिपत्याखाली असलेलं ठाणं लुटलं गेलं होतं. नव्हे जळून खाक झालं होतं. त्यांची नोकरीही धोक्यात आली होती. पोरं परांगदा झाली होती.
पोलीस ठाण्यावरील हल्ल्याने गावातील वातावरण एकदम बदललं. ही काही साधीसुधी गोष्ट नव्हती. पोलीस ठाण्यावर हल्ला म्हणजे जणू निजाम सल्तनतीच्या गादीवर हमला होता. याविरोधात निजामी प्रशासनातून चक्रे फिरू लागली. तेव्हाचा उस्मानाबाद जिल्हा पोलीस प्रमुख अबुल हसनच्या मार्गदर्शनाखाली व उमरग्याचे सर्कल प्रमुख अप्सरअली यांच्या नेतृत्वाखाली पोलीसांनी गाव नेस्तनाबूत करण्याचा विडा उचलला. आमीन साहेबांना याविषयी जाब विचारण्यात आला. माहित असूनही या कटात नाईचाकूर मधील कुणीच नव्हतं, असा रिपोर्ट त्यांनी दिला. तरी पण रझाकार ऐकायला तयार नव्हते.
यामागे खूप मोठ षडयंत्र आहे. गावातील लोकांची साथ असल्याशिवाय बाहेरचे लोक येऊन हे कृत्य कसे करू शकतात, असं रजाकारी सेनेला वाटू लागलं. आता जर या गोष्टीकडे कानाडोळा केला तर पुढं यापेक्षाही भयानक घटना घडतील अशी शंका रजाकारांना वाटू लागली. तेव्हा रजाकारांनी गावालाच शिक्षा देण्याचं ठरविलं. साऱ्या गावाला जाळून टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या. तेव्हा सारं गाव भयभीत झालं. आंदोलनकर्ते भूमिगत झाले. गावातील कारभारी लोकं या आंदोलनकर्त्यांच्या नावानं शिव्या देऊ लागली. गावातील बायकापोर म्हातारे कोतारे सारे घाबरून गेले. आता आपलं काही खरं नाही, रझाकार गावाला काही सोडत नाहीत असं सगळ्यांना वाटू लागलं. गावावर शोककळा पसरली. गावातली सारी कारभारी लोकं आपापल्या घरात किंवा रानावनात दडी मारून बसली. तवा गावाला वाचवण्यासाठी समोर आल्या त्या बुबू भाभी.
गावात रझाकार शिरलेले. आदेश होता संपूर्ण गावाला जाळण्याचा. तेवढ्यात त्या रजाकारी पोलिसांसमोर बुबू भाभी अत्यंत निर्भयपणे सामोर जाऊन म्हणाल्या, "खबरदार कोई आगे बढ़ा तो, ये सब मेरे भाई लोग है। अगर किसीने गांव को जलाने की कोशिश की तो उसमें मैल पहले कुदूंगी।" बुबू भाभीच्या या ललकारीने रजाकार भांबावून गेले. त्यांना काय करावे ते सुचेना. कारण समोर उभी ठाकलेली बाई साधीसुधी नव्हती. ती आमीन सायबाची पत्नी होती. शेवटी पोलिसांनी नाईलाजास्तव माघार घेतली आणि गाव बेचिराख होण्यापासून वाचलं. सारं गाव बूबू भाभीच्या उपकाराने भारावून गेलं. म्हाताऱ्या कोताऱ्या बाया म्हणायला लागल्या,"बगा माय, न जातीची ना गोतीची, पर गावासाठी कसं समोर आली, ती जर आज नसती तर रझाकारांनी गावाची पार राखरांगोळी केली असती."
बुबू भाभी आज नसती तर गावची काय अवस्था झाली असती, हा विचार करूनच गावातील लोकांच्या अंगावर काटा येऊ लागला.नंतरच्या काळात हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलन आणखी तीव्र झालं. गावात स्वातंत्र्य आंदोलनातील एखाद्या आंदोलना संबंधी संदेश द्यायचा किंवा एखाद्या नेत्याची सभा व्हायची तवा पुन्हा गाव पेटून उठायचं. गावात सिदाप्पाच्या कट्टयावर नाना पाटलांची सभा झाली. या सभेने परिसरातील युवकांमध्ये जणू नवक्रांतीच संचारली. क्रांतिसिंह नाना पाटलांच्या सभेसंबंधी औंढा गावचे बिराजदार अण्णा सांगतात की,
"आम्ही मुदगडला शाळेला व्हतो. जवा आम्हाला कळलं की नाना पाटलांची चाकूरला सभा हाय, तवा आम्ही पोरं पोरं जमलो अन सभेला जायचं ठरलं. गावात काही पोरांच्या घरी याची कुणकुण लागली तवा काही शाहनी माणसं म्हणाली, 'कशाला या भानगडी, नसल्याला कुटाना मागी लागंल; परंतु आम्ही पोरांनीच एका दोस्ताच्या शेतातील बैलगाडी त्याच्या बापाच्या परबाऱ्याच जुपली अन् आलो सभेला. सभा लई जंगी झाली. नाना पाटलांची शड ठोकून दिलेली ललकारी व त्यांचा भारदस्त आवाज आजबी कानात घुमतोय ."
नाना पाटलांची झालेली जंगी सभा, हैदराबाद मुक्तिसंग्रामातील नेत्यांनी आंदोलनाच्या दिलेल्या हाकेनं पुन्हा गावाचं वातावरण बदलून गेलं. आता गावात आनिक कोणती भानगड व्हत्याय गा, म्हणून सामान्य लोक, बायका, पोरं हवालदिल झाली. पोलीस ठाण्यावर हल्ला करणारी पोरं तर भूमिगत झालेली. निरनिराळ्या अफवा पसरत होत्या, रानावनात राहूनबी पोरांना साऱ्या खबरा मिळत होत्या. हिरा पवारासारखी काही लहान पोरंबी रानात बापाच्या भाकरी घेऊन चाललाव म्हणून त्या भूमिगत पोरांना भाकऱ्या नेऊन देत होते व गावातील खबरा पोहोचवत होते तर दुसरीकडं रझाकाराच्या चिथावणीला बळी पडून काही पोरं मुस्लिम बनून गावातील खबरा रझाकारांना पोहोचवत होते, यातीलच एक होता इस्माईल. (जो अगोदर हिंदू होता त्याचं नाव विश्वनाथ पवार होतं.) हा गावातच सालगडी म्हणून काम करायचा, तसा हा मुलगा सर्वांशी मिळून मिसळून वागणारा; परंतु हा गावातील गुप्तवार्ता रझाकारांना पोहोचवितो,
हा रझाकाराचा खबऱ्या हाय, अशी शंका गोविंद पवार या क्रांतिकारकाला लागली आणि एके दिवशी पोलीस ठाणं लुटल्याच्या दिवसापासून भूमिगत असलेला हा गोविंद पवार गावात गुपचुप आला. गणपती मंदिरा जवळ इस्माईलला गोळ्या घालून क्षणातच परागंदा झाला. जेव्हा गावात ही घटना समजली तेव्हा गाव पुन्हा भयभीत झालं. पोलीस गावकारभाऱ्यांना येऊन या घटनेविषयी, गोविंद पवारच्या ठावठिकाण्या विषयी विचारू लागले; परंतु गावातून काहीच खबर मिळत नव्हती, तेव्हा रझाकारांनी गोविंद पवारला जिंदा या मुडदा पकडण्याचा आदेश दिले. आमीन सायबांवरतु दबाव वाढला तेंव्हा त्यांनी सांगितलं, "मैं गोविंद पवार को पकड़के सजा दूंगा, आप फिक्र मत करो।"
या वेळेस रजाकार ऐकायला तयार नव्हते.पहिलंच पोलीस ठाण्यावरील हल्ल्याने हे गाव रझाकारांच्या डोळ्यांत सलत होतं, पुन्हा या घटनेनं तर त्यांची वक्रदृष्टी आणखीनच वाढली. रजाकार गावात घुसले. दिसेल त्याला मारहाण करू लागले. भूमिगत पोरांचा ठावठिकाणा विचारू लागले. एवढेच नाही तर त्यांनी गावातील घरादारावर दगडफेक सुरू केली, आता मात्र बायका पोरांनी धीर सोडला. गावातील गडीमाणसं गाव सोडून केव्हाच रानावनात पळून गेली होती. आता गाव रझाकारांच्या तावडीतून सुटत नाही असं म्हाताऱ्या कोताऱ्यांना वाटू लागलं. आता काही खरं नाही असं वाटत असतानाच गावच्या मदतीला पुन्हा समोर आली बुबू भाभी आणि तिनं रजाकारालाच आव्हान दिलं, "अगर गांव को जलाना है, तो पहले यह काड़ी और घासलेट लो और पहले हमें जलाओ।” तेव्हा चवताळलेल्या व सूडबुद्धीने पेटून उठलेल्या त्या रझाकारांना काय करावं ते समजेना. बुबू भाभीच्या या अचानक आव्हानाने रजाकार नरमले आणि ते माघारी फिरले. पुन्हा एकदा गाव बुबू भाभीमुळं वाचलं. म्हातारी कोतारी बायका, पोरं तिला दुवा देऊ लागले.
१७ सप्टेंबर १९४८ अनेक स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाने हा परिसर निजामाच्या तावडीतून मुक्त झाला. निजामाने शरणागती पत्करली. ज्या रझाकारांनी हिंदूंवर अत्याचार केले ते सरदार पटेलांचा दंडुका दिसताच कधी पळून गेले हे कुणालाच कळले नाही; परंतु आता रान मोकळे दिसताच हिंदूंनी आपले हात मोकळे करायला सुरुवात केली. रझाकार तर निघून गेले; परंतु अफवांचे पेव सुटले. तसं पाहायला गेलं तर दंगलखोरांना ना कोणती जात असते ना धर्म. आता गावोगावच्या सामान्य मुसलमानांकडेही संशयाने पाहिलं जाऊ लागलं व त्यांनाही गाव शिवारातून पिटाळायला सुरुवात झाली. अशा अनेक घटना आजूबाजूच्या गावातही घडत होत्या. रामलिंग मुदगड येथील माधव बिराजदार एक पैलवान, रांगडा गडी. मैत्रीच्या दुनियेतलाबी वस्ताद; परंतु तोही या वातावरणाला बळी पडला. लहानपणापासूनचा त्याचा एक मुस्लिम जिगरी दोस्त होता त्याचं नाव अब्दुला. एकमेकाशिवाय दोघांचं पान हालायचं नाही; परंतु माधव पैलवानाच्या डोक्यात संशयाचं भूत शिरलं आणि आपल्या या मुस्लिम जिगरी दोस्त अब्दुल्लाला ठार मारण्यासाठी तो त्याच्या मागे लागला. अब्दुला तर भांबावलाच. त्याला वाटायचं, "सारं गाव माझ्या विरुधात जाईल, पर माझा जिगर माधु माझ्याबरोबर असल्यावर मला कशाची चिंता." परंतु तोच दोस्त आपल्या जीवावर उठलाय हे जवा त्यानं पाहिलं तवा आपला जीव वाचविण्यासाठी राना रानानं कदमापूर गावाकडं पळाला. तो कदमापूर शिवारात आला अन् पाहिलं तर समोर त्याचा व माधव पैलवानाचा कदमापूरचा दोस्त नरसिंग उभा. तेव्हा तो आणखीनच घाबरला. भलेही नरसिंग त्याचा दोस्तच. पर हेबी हिंदूच की थोडावेळ तो गडबडला; परंतु इलाज नव्हता. अब्दुल नरसिंगला म्हणाला, “दोस्ता, मला वाचव, मला माधु मारायला इवलालाय.'
नरसिंग म्हणाला, “अबे कायबी कसं बोल्लालायस, आपण तर सगळे दोस्त हाव की, तुझा तर तो लई जिगर हाय की. ""कशाचा जिगर अन् काय, सगळा मामलाच बिघडलाय.” तेव्हा नरसिंगनं अब्दुल्लाला आपल्या शेतातील कडब्याच्या बनमीत लपवलं. थोड्यावेळाने तिथं महादू पैलवान आला, नरसिंगला म्हणाला, "अरं ते मुस्लमान इकडं आल्तं का ?
"आल्तं की, आताच इथून लवनातून पुढं गेलं.."माधव पैलवान तसाच पुढे गेला.आठ-दहा दिवस अब्दुल्ला तिथंच बनमीत कोप करून राहिला. नरसिंगने त्याच्या भाकरी तुकड्याची सोय केली. थोडं वातावरण निवळलं. अब्दुल्ला त्रिकोळी मार्गे आळंदला आपल्या पाहुण्याकडं गेला व तिथंच स्थायिक झाला. आजूबाजुला अशा घटना घडत असताना सारेच भेदरलेले.
हैदराबाद संस्थान स्वराज्यात विलीन झालं;निजामाने शरणागती पत्करली. परंतु त्याचे पोलीस व त्याचे अनुयायी यांच्यावर जीव मुठीत घेऊन सैरावैरा व्हायची वेळ आली. जीव मुठीत घेऊन ते लोक जगू लागले. जिथं सामान्य मुसलमानांकडेही संशयाने पाहू जाऊ लागलं, तिथं बुबू भाभी व त्यांचं घराणं तर निजामाचे चाकर होते. भलेही त्यांनी आपल्या कर्तव्याबरोबरच माणुसकीचा धर्मही पाळला होता. साऱ्या गावाला बुबू भाभी व आमीन साहेबांचा स्वभाव माहीत होता; अमीन साहेबांनी आपल्या कुटुंबासह हैदराबादला जाण्याचं ठरविले. तेव्हा माथेफिरूंपासून धोका होऊ नये म्हणून गावातील प्रेमनाथ पवार व काही ग्रामस्थांनी आमीन साहेबाचा पसारा बैलगाडीत भरला. बुबू भाभीला निरोप देताना आपल्या लेकीला सासरी पाठवण करीत असल्यासारखं आजूबाजूच्या बायका मुसमुसत होत्या, जड अंतकरणाने त्यांनी आपल्या लेकीला निरोप दिला. हे दांपत्य गाव सोडून हैदराबादच्या दिशेने निघालं, आपला जीव मुठीत घेऊन ते प्रवास करीत होतं. त्यांची बैलगाडी सरवडी शिवारात आली. तोच एका माथेफिरूच्या टोळक्यानं त्यांना गाठलं आणि कुठलाही मागचा पुढचा विचार न करता बुबू भाभी सह कुटुंबाचे तुकडे तुकडे केले. गावात जवा हे समजलं तेव्हा सारं गांव हळहळलं तवा एक म्हातारी कळवळून म्हणाली,
"अरं, ज्या माय माऊलीमुळं दोनदा आख्ख गाव वाचलं, तिचंच सारं कुटुंब फक्त नफरतीच्या आगीत संपाव यापेक्षा दुर्दैवं कोणतं ? जातधर्माच्या पलीकडे जाऊन माणूसकीच्या पाऊलखुणा सोडून गेलेली बुबूभाभी आजही साऱ्या गावच्या हळहळीचा, आस्थेचा अन चर्चेचा विषय बनून गेली.
हैदराबाद मुक्ती संग्रामात आपलं मोलाचे योगदान देणाऱ्या ज्याला मराठवाड्याचे क्रांतीसुर्य म्हणून ओळखलं जातं त्या कॉम्रेड गोविंद पवार यांनी 1965 च्या दरम्यान नाई चाकूर गावामध्ये एक अष्टकोनी विजयस्तंभ उभारला . त्या झेंड्याची उद्घाटन क्रांतीसुर्य नाना पाटील यांच्या हस्ते झाले होते. तो झेंड्याचा कट्टा आजही नाई चाकूर नगरीच्या स्वातंत्र्यसैनिकाच्या विजयाचे प्रतीक म्हणून अभिमानाने उभा आहे. आजही नवीन पुनर्वशीत गावात त्या ठिकाणी सर्व गाव जमा होतं आणि स्वातंत्र्य सैनिकाला अभिवादन केले जाते.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त संग्रामात योगदान देणाऱ्या सर्व नाईचाकूर पंचक्रोशीतील स्वातंत्र्यवीरांना मानाचा मुजरा.
- डॉ. प्रा .हणमंत पवार नाईचाकूर
0 Comments