Hot Posts

6/recent/ticker-posts

हृदयद्रावक घटना : चॉकलेट साठी पैसे मागितल्याच्या कारणावरून पोटच्या चार वर्षाच्या चिमुकलीचा जन्मदात्यानेच केला गळा आवळून खून लातूर जिल्ह्यातील घटना

हृदयद्रावक घटना : चॉकलेट साठी पैसे मागितल्याच्या कारणावरून पोटच्या चार वर्षाच्या चिमुकलीचा जन्मदात्यानेच केला गळा आवळून खून लातूर जिल्ह्यातील घटना


लातूर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. केवळ चॉकलेटसाठी पैसे मागितल्याने एका चार वर्षांच्या चिमुकलीचा जन्मदात्यानेच साडीने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी समोर आली. यामध्ये मृत मुलीचे नाव आरुषी बालाजी राठोड असून, आरोपी वडील बालाजी बाबू राठोड याच्याविरुद्ध उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे लातूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

फिर्यादी वर्षा बालाजी राठोड यांचा विवाह 2019 साली बालाजी राठोड याच्याशी झाला होता. या दांपत्याला आर्यन आणि आरुषी अशी दोन अपत्ये आहेत. मात्र, बालाजी याला दारूचे व्यसन जडले असून, सततच्या वादामुळे पत्नी वर्षा गेल्या तीन महिन्यांपासून माहेरी राहत होती.

घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच  बालाजीने जबरदस्तीने सासरहून आपल्या मुलगी आरुषीला भीमा तांड्यावरील घरी आणले होते. रविवारी दुपारी अडीच च्या सुमारास, वर्षाच्या काकाच्या मोबाईलवर तिच्या सासूने मंगलबाई बाबू राठोड फोन करून माहिती दिली की, बालाजीने आरुषीला घरातच साडीने फाशी देऊन ठार मारले असून, तिला उदगीर शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे.

ही धक्कादायक बातमी मिळताच वर्षा यांनी तत्काळ रुग्णालय गाठले, मात्र डॉक्टरांनी मुलगी मृत झाल्याचे घोषित केले. रात्री उशिरा या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी बालाजी राठोडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

नवऱ्याला फाशी द्या मृत मुलीच्या आईची मागणी

चार वर्षाच्या आरुषीला माझ्या नवऱ्याने मारून टाकले आहे. त्याला जिवंत ठेवू नका त्याला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आरोपीची पत्नी आणि मयत आरुषीची आई वर्षा ठाकूर यांनी केली आहे. नराधम बापाला दारूच्या पुढे बायको लेकरू हे नाते सुद्धा समजले नाही अशा वृत्तीच्या लोकांना जगण्याचा अधिकार नाही अशा भाषेत पोलीस स्टेशनमध्ये मृत मुलीच्या आईने टाहो फोडला.उदगीर  ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये बालाजी राठोड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक पुजारी आणि त्यांची टीम करत आहे.

चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास सोडला नाही 

पुढे आलेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील बालाजी बाबु राठोड या 36 वर्षीय व्यक्तीला चार वर्षाची मुलगी आहे. बालाजी राठोड हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. दुपारी चार वर्षाच्या त्याच्या मुलीने चॉकलेटसाठी हट्ट धरला. दरम्यान याचा राग आनावर झाल्याने रागाच्या भरात असलेल्या बालाजी राठोड याने साडीने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आहे. आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास काही सोडला नव्हता. अखेर आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला. त्यानंतर तीने तात्काळ उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तपासांती हा गुन्हा बालाजीनेच केल्यास उघड झालं. उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली आणि तो पळून जात असतानाच त्याला तात्काळ अटक करण्यात आली. सध्या पोलीस या हृदयद्रावक घटनेचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments