मोठी बातमी: मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाच्या परवानगीत एक दिवसाची वाढ-
मुंबई प्रतिनिधी : मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला सुरुवात केली आहे. याआधी या आंदोलनासाठी आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती, मात्र आता आणखी एका दिवसासाठी आंदोलनाला मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे आज रात्री मनोज जरांगे पाटील आणि मराठा आंदोलक हे आझाद मैदान परिसरात मुक्कामी असणार आहेत.
नियम आणि अटीवर आंदोलनाला परवानगी
मराठा आंदोलकांकडून आज दिवसभर झालेला घटनाक्रम पाहता आणखी काही कडक नियम व अटी पोलिसांकडून लावण्यात आले आहेत. न्यायालयाच्या आदेशानुसार आंदोलकांची संख्या ५ हजारांच्या आत ठेवण्याची अट घालण्यात आली आहे. मात्र, जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम असून मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे लाखो मराठा आंदोलक संघटित झाले आहेत. ज्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर देखील झालेला पाहायला मिळाला. पावसामुळे आंदोलकांची गैरसोय झाली असली तरी, अनेकांनी रिकामी जागा, रेल्वे स्थानक परिसर तसेच बसथांब्यांवर आसरा घेतला. दरम्यान मंत्रालय, सीएसएमटी परिसरात शेकडो आंदोलकांनी मोर्चा वळवून घोषणा दिल्या. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या संख्येतील लोकांना सांभाळणे ही मुंबई पोलिसांसमोरची मोठी कसोटी ठरली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडून योग्य व्यवस्था न केल्याचा आरोपही केला आहे.

0 Comments