धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही - जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार-Dharashiv Rain Falls crop Damage Collector
धाराशिव /प्रतिनिधी रूपेश डोलारे दि. २६ : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची कोणतीही सक्ती नाही, असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज स्पष्ट केले.
जिल्ह्यात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. काही भागांमध्ये नद्या आणि नाल्यांना पूर आल्याने शेतजमिनी खरवडून गेल्या आहेत. या गंभीर परिस्थितीचे पंचनामे करण्यासाठी महसूल आणि कृषी विभाग एकत्रितपणे काम करत आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना जिल्हाधिकारी पुजार म्हणाल्या, "काही जिल्ह्यांमध्ये पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडून फोटो मागितले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र, धाराशिव जिल्ह्यात अशी कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांनी फक्त आपले नुकसानग्रस्त क्षेत्र दाखवायचे आहे; पंचनाम्यासाठी आवश्यक पुरावा गोळा करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे."
शासनाकडून मिळणाऱ्या मदतीपासून कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही, याची खात्री करण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी कोणत्याही गैरसमजाला बळी पडू नये आणि पंचनाम्याच्या प्रक्रियेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी केले आहे.

0 Comments