चिवरी पंचायत समिती गणातून उबाठा गटाकडुन तीन शिवसैनिक उमेदवारीसाठी इच्छुक , कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार ? याकडे नागरिकांचे लक्ष-
चिवरी : स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका अगदी तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि तुळजापूर तालुक्यातील सर्वच मतदार संघात जो तो आपणालाच उमेदवारी मिळावी यासाठीच धडपडत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अणदुर जिल्हा परिषद गटातील चिवरी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आला आहे यामुळे या गणात अनेक इच्छुक उमेदवारांची गर्दी दिसून येत आहे . चिवरी पंचायत समिती गणातून उबाठा गटाकडून तीन इच्छुक उमेदवारांनी पक्षाकडे मागणी केली आहे यामध्ये चिवरी येथील नेताजी (बबन) अशोक शिंदे , चिवरी येथील मल्लिनाथ (आप्पा) सारणे, तसेच गंधोरा येथील संजय भोसले यांच्या नावाची महाविकास आघाडी उबाठा गटाकडून उमेदवारीची जोरदार चर्चा सुरू आहे.
नेताजी शिंदे यांच्या संभाव्य उमेदवारीला केवळ स्थानिक पातळीवरच नव्हे तर वरिष्ठ राजकीय वर्तुळातुनही पाठबळ मिळण्याची शक्यता आहे. नेताजी शिंदे यांचे मोठे बंधू सचिन शिंदे हे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक असल्याचे संबंध सर्वश्रुत आहे. त्यामुळे नेताजी शिंदे यांच्या उमेदवारीला उबाठा गटाकडून हिरवा कंदील मिळाल्यास त्यांची दावेदारी अधिक मजबूत होऊ शकते. नेताजी शिंदे हे तरुण सुशिक्षित, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर,भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवणारे, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवणारे म्हणून परिचित आहेत.
________ _______________________________
याच गणातून उबाठा गटाचे निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळख असलेले मल्लिनाथ (आप्पा) सारणे यांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी घातली आहे; मल्लिनाथ सारणे हे मागील तीस वर्षापासून शिवसेनेचे काम करतात, तेही गणातील गावांमध्ये शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या समस्या वरिष्ठ पातळीवरील लोकप्रतिनिधीशी संपर्क साधून सोडवतात; त्यामुळे मल्लिनाथ आप्पा सारणे यांच्याही नावाची जोरदार चर्चा गणात सुरू आहे.
__________________________________________
तसेच याच गणातील गंधोरा येथील संजय भोसले यांनीही पक्षाकडे उमेदवारीसाठी मागणी केली आहे, श्री भोसले हे मागील 27 वर्षापासून शिवसेना पक्षाचे काम करतात, तेही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत त्यांनी तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती पद भूषवले आहे, तर विद्यमान संचालक आहेत तसेच पंधरा वर्षे गंधोरा ग्रामपंचायत वर सदस्य आहेत तर विद्यमान गंधोरा गावचे उपसरपंच देखील आहेत; त्यांची राजकारणातील कारकीर्द चांगली आहे . त्यांचा देखील या गणामध्ये जनसंपर्क मोठा आहे.
एकंदरीत आता उबाठा गटाकडून चिवरी पंचायत समिती गणातील उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? याकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे यंदा चिवरी पंचायत समिती गणाची निवडणूक अत्यंत चुरशीची आणि लक्षवेधी ठरणार हे निश्चित आहे.



0 Comments