अल्पवयीन १६ वर्षीय मुलीचा बालविवाह पोलिसांनी रोखला, आठ आरोपींसह 50 ते 60 वराडीमंडळीवर गुन्हा दाखल बीड जिल्ह्यातील घटना -
बीड/प्रतिनिधी रूपेश डोलारे : बालविवा सारख्या सामाजिक कु प्रथेला आळा घालण्यासाठी बीड जिल्हा पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे तालुक्यातील कपिलधार देवस्थानातील सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा होणारा बालविवाह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने ऐनवेळी उधळून लावला.पोलीस घटनास्थळी पोहोचल्याचे लक्षात येताच नवरदेवाने थेट विवाह मंडपातून पलायन केल्याचा प्रकार घडला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Beed Crime News) याप्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
या घटनेबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की गुरुवार दिनांक 5 रोजी सकाळी साडेअकरा वाजता सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या प्रभारी अधिकारी उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांना दूरध्वनीवरून माहिती दिली की दुपारी 12 वाजता कपिलधार देवस्थान येथे एका 16 वर्षाच्या मुलीचा विवाह लावला जाणार आहे.या माहितीची तातडीने दखल घेत उपनिरीक्षक पल्लवी जाधव यांनी आपल्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
देवस्थान परिसरात एकाच वेळी दोन ते तीन विवाह सुरू होते त्यामुळे मोठी गर्दी जमलेली होती संशय न येण्यासाठी पथकाने पहिले हॉलमध्ये प्रवेश केला. तेथे चौकशी दरम्यान एका महिलेने मुलीचे नाव चुकीचे सांगितले मात्र आडनाव विचारताच ती बरोबर माहिती देऊ लागल्याने संशय बळावला .पथकाने मुलीला ताब्यात घेण्याच्या तयारीत असतानाच वऱ्हाडी मंडळींना पोलिसाचा संशय येताच एकच गोंधळ उडाला या गडबडीत नवरदेव पळून जाण्यात यशस्वी ठरला मात्र उपनिरीक्षक जाधव यांनी प्रसंगावधान राखत अल्पवयीन मुलीला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
त्यानंतर उपस्थितांनी पळून जाणाऱ्या वराडी मंडळींना थांबवून बालविवाह प्रतिबंधक अधिनियमाबाबत सविस्तर जनजागृती पर मार्गदर्शन करण्यात आले पीडित मुलीला विश्वासात घेऊन समुपदेशित केले असता तिने आपला विवाह पिंपळाची वाडी तालुका शिरूर कासार येथील एका 24 वर्षीय तरुणांशी होणार असल्याचे सांगितले. पीडित मुलीचे आई-वडील मामा तसेच नवरदेव व त्याचे आई वडील फरार झाल्याने त्यांच्या नातेवाईकांना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.
तसेच नवरदेव व त्याच्या पालकांना तात्काळ पोलिस ठाण्यात हजर होण्याच्या सूचना वराडी मंडळीमार्फत देण्यात आल्या याप्रकरणी बालविवाह प्रतिबंधक अधिकारी तथा ग्रामपंचायत अधिकारी पाली बीड श्रीराम वीर यांना घटनास्थळी व नंतर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात बोलवून सर्व माहिती देण्यात आली. त्यांच्या तक्रारीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 8 आरोपी सह 50 ते 60 वराडी मंडळी तसेच देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त व सदस्यविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित अल्पवयीन मुलीच्या सुरक्षितता व संरक्षणासाठी तिला बालकल्याण समिती बीड यांच्यासमोर हजर करण्याच्या सूचना तपास अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कावत अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एच टी यू च्या पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव पोलीस हवालदार उषा चौरे व पोलीस शिपाई अक्षय जाधव यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
कपिलधार देवस्थानवर यापूर्वीही बालविवाह
गुरुवारी दुपारी कपिलधार देवस्थान येथे विवाहाचा मुहूर्त होता. ही माहिती सामाजिक कार्यकर्ते तत्त्वशील कांबळे यांनी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला कळवली. पोलिसांनी मुलीला ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली. कपिलधार देवस्थानात यापूर्वीही बालविवाह रोखले गेले आहेत. वयाचा पुरावा न तपासता विवाहास अप्रत्यक्ष परवानगी दिली जात असल्याचा आरोप असून, देवस्थान समितीची चौकशी करून कडक कारवाईची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.


0 Comments