शेतकऱ्यांची जनावरे चोरी करणारी टोळी जेरबंद;०८ म्हशी जप्त; ०२ आरोपी ताब्यात, १३ गुन्ह्यांची कबुली-Animal Robbery Dharashiv Crime News
धाराशिव प्रतिनिधी:
धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या जनावरांची चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने मोठा दणका दिला आहे. ०८ म्हशींसह ०२ आरोपींना अटक करण्यात आली असून, म्हैस चोरीचे एकूण १३ गुन्हे उघडकीस आले आहेत. जप्त केलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे १२ लाख १५ हजार रुपये इतकी आहे.
दि. २० फेब्रुवारी २०२६ रोजी मौजे लासोना शिवारातील एका शेतकऱ्याच्या ०५ म्हशी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली होती. याबाबत पोस्टे बेंबळी येथे अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्ह्यात अशा प्रकारचे जनावरे चोरीचे अनेक गुन्हे घडत असल्याने रितू खोखर, पोलीस अधीक्षक, धाराशिव यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सुदर्शन कासार व पथकाने तपास सुरू केला. गोपनीय माहितीच्या आधारे नेकनूर (जि. बीड) येथील संशयित इसम चोरीच्या परिसरात येऊन गेल्याचे समोर आले.
पथकाने चंद्रकांत जगन्नाथ नन्नवरे (रा. नन्नवरे वस्ती, नेकनूर, ता. जि. बीड) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने साथीदार शंकर सुरेश चव्हाण (रा. ढोकी) याच्या मदतीने विविध ठिकाणांहून म्हशी चोरी केल्याची कबुली दिली. त्यानुसार दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
आरोपींनी येवती, लासोना, बेंबळी, कोंड, तुळजापूर, काटी सावरगाव, सांगवीमार्डी, सुरतगाव, वैराग व माणकेश्वर शिवार या ठिकाणांहून म्हशी चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून ०८ म्हशी, चोरीसाठी वापरलेले महिंद्रा पिकअप वाहन व हिरो स्प्लेंडर दुचाकी असा एकूण १२,१५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
आरोपींनी धाराशिव जिल्ह्यातील एकूण १३ गुन्ह्यांची कबुली दिली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा व उर्वरित जनावरांचा शोध सुरू आहे. पुढील कारवाईसाठी आरोपी व जप्त मुद्देमाल पोस्टे धाराशिव ग्रामीण यांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई शफकत आमना, अपर पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

0 Comments