निलेश घायवळ गॅंग टोळीतील गुंड अमोल लाखे बार्शीतून अटकेत; दोन मोक्का गुन्ह्यांतील फरार आरोपी पोलिसांच्या जाळ्यात-
सोलापुर : चार महिन्यांपासून फरार असलेला आणि दोन मोक्का गुन्ह्यांमध्ये हवा असलेला ‘निलेश घायवळ टोळी’तील आरोपी अमोल दत्तात्रय लाखे (वय २७, रा. ईटखेडा, छत्रपती संभाजीनगर) याला अखेर पुणे पोलिसांनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथून अटक केली. वारजे माळवाडी पोलीस ठाणे आणि कोथरूड पोलीस ठाणे येथे दाखल असलेल्या मोक्का गुन्ह्यांत तो फरार होता.
शाळेच्या पुरवठादार महिलेला धमकावून खंडणी उकळल्याचा आरोप
पोलिसांच्या माहितीनुसार, लाखेवर शाळेच्या पुरवठादार असलेल्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो पोलिसांच्या नजरेआड झाला होता.
माहितीदाराची खबर आणि तांत्रिक विश्लेषण
२५ फेब्रुवारी रोजी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना माहितीदारांकडून लाखे बार्शीत लपल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे (मोबाईल लोकेशन व इतर डिजिटल इनपुट) त्याची खात्री करण्यात आली. २६ फेब्रुवारीच्या पहाटे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे छापा टाकून त्याला ताब्यात घेण्यात आले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम आणि सहायक पोलीस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी व पोलीस निरीक्षक प्रकाश धेंडे यांच्या सूचनेनुसार विशेष पथकाने ही मोहीम यशस्वी केली.
कबुली व पुढील तपास
प्राथमिक चौकशीत लाखेने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्याच्याकडून टोळीतील इतर सदस्यांबाबत व संबंधित गुन्ह्यांबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, या अटकेमुळे ‘निलेश घायवळ टोळी’च्या कारवायांना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.
निलेश घायवळ यांचे प्रकरण काय आहे?
पुण्यातील कोथरूड परिसरात १७ सप्टेंबर रोजी रात्री पावणेबाराच्या सुमारास मुठेश्वर चौकात किरकोळ कारणावरून वाद निर्माण झाला. रस्ता न दिल्याच्या कारणावरून निलेश घायवळ टोळीतील सदस्यांनी तक्रारदार व त्यांच्या मित्रांना मारहाण केली. या दरम्यान एका आरोपीने पिस्तुलातून गोळीबार केला. त्यानंतर आरोपींनी सागर कॉलनी परिसरात वैभव साठे याच्यावर कोयत्याने वार करत दहशत माजवली. “आम्ही या भागाचे भाई आहोत,” असे म्हणत टोळीने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घायवळ टोळीच्या सदस्यांसह टोळीप्रमुख निलेश घायवळ याच्यावरही मकोका अंतर्गत कारवाई केली. तपासादरम्यान निलेश घायवळ फरार असून तो परदेशात पळून गेल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरोधात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली असून, अटकेसाठी त्याचा पासपोर्ट रद्द करण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी सरकारी वकिलांनी न्यायालयाकडे केली आहे.

0 Comments