धक्कादायक! मुलगा होत नसल्याने पत्नीची निर्घृण हत्या; पतीला जन्मठेपेची शिक्षा-Dharashiv New
धाराशिव/प्रतिनिधी रूपेश डोलारे : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून पत्नीचा गळा दाबून व कोयत्याने वार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या नराधम पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती अभिश्री देव यांनी बुधवारी (४ मार्च) हा महत्त्वपूर्ण निकाल दिला.
कौटुंबिक वादातून घडली क्रूर घटना
या प्रकरणातील आरोपी धनंजय भारत माळी व मृत गोजर धनंजय माळी हे दाम्पत्य होते. त्यांना तीन मुली होत्या. मात्र आरोपीला मुलगा हवा असल्याने घरात नेहमी वाद होत असत. आरोपी कोणतेही नियमित काम करत नसल्याने तीन मुलींचा सांभाळ करणे गोजर यांना अवघड जात होते. त्यामुळे त्यांनी चौथे अपत्य होऊ देण्यास विरोध केला होता.
या कारणावरून दोघांमध्ये सतत वाद होत असत. अखेर घरातील तणाव कमी व्हावा म्हणून गोजर यांनी चौथ्यांदा गरोदर राहण्यास अनिच्छेने का होईना संमती दिली होती. मात्र आरोपीच्या मनातील राग कायम राहिला.
“डोके दुखते” सांगून आखला कट
दि. १९ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी सुमारे ४.३० वाजता आरोपी धनंजय माळीने घरात असलेल्या मुलीला “माझे डोके दुखत आहे, तू बाहेर जाऊन खेळ” असे सांगून बाहेर पाठवले. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करून त्याने पत्नी गोजर यांचा गळा दाबला.
त्यानंतर कोयत्याने त्यांच्या गळ्यावर वार करून अत्यंत क्रूरपणे हत्या केली आणि घटनास्थळावरून फरार झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
१० वर्षांच्या मुलीची साक्ष ठरली निर्णायक
या प्रकरणाचा तपास नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. डी. गिते यांनी केला. तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
खटल्यादरम्यान एकूण १३ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. आरोपीची १० वर्षांची मुलगी ही या प्रकरणातील महत्त्वाची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार ठरली. तसेच आरोपीच्या कपड्यांवरील रक्ताचे नमुने, शस्त्र आणि वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल हे पुरावे न्यायालयात महत्त्वाचे ठरले.
न्यायालयाने ठोठावली जन्मठेप
जिल्हा सरकारी वकील महेंद्र बी. देशमुख यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. सर्व पुरावे व साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून न्यायालयाने आरोपी धनंजय माळी याला भारतीय न्याय संहिता (पूर्वीचे भादंवि) कलम १०३(१) अंतर्गत दोषी ठरवले.
यानुसार न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला.
समाजाला विचार करायला लावणारी घटना
मुलगा हवा या चुकीच्या मानसिकतेतून पत्नीची हत्या झाल्याची ही घटना अत्यंत धक्कादायक असून समाजातील विकृत मानसिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ठरली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पीडितेला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

0 Comments