नळदुर्ग : गोवा गुटखा तस्करी उघड; कारवाईदरम्यान पोलिसांना धमकी – चार जणांवर गुन्हा-Naldurg Police Station Crime News
नळदुर्ग | प्रतिनिधी : नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेल परिसरात पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गोवा गुटखा जप्त करण्यात आला असून, शासकीय कामात अडथळा निर्माण करत पोलिसांना धमकावल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाण्यातील फिर्यादी दत्तात्रय माणिकराव कुंभार (वय 41) हे आपल्या स्टाफसह दि. 27 मार्च 2026 रोजी सकाळी सुमारे 9.12 वाजता नळदुर्ग बायपास रोडवरील निसर्ग हॉटेलजवळ शासकीय कामकाज पार पाडत होते. यावेळी आरोपी संजय सुभाष जगताप (रा. वानेवाडी, ता. पाटोदा, जि. बीड), सचिन परमेश्वर पवर (रा. कुसळंब, ता. पाटोदा, जि. बीड), सतीश तुकाराम सोंडगे (रा. गवळवाडी, ता. पाटोदा, जि. बीड) आणि मिट्टू उर्फ इंद्रजितसिंग रणजितसिंग ठाकूर (रा. नळदुर्ग, ता. तुळजापूर, जि. धाराशिव) हे त्यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो (क्र. MH 16 CD 2395) मधून मोठ्या प्रमाणावर गोवा गुटख्याची वाहतूक करताना आढळून आले.
तपासादरम्यान पोलिसांनी टेम्पोमध्ये तब्बल 50 मोठ्या गोण्या भरून ठेवलेला महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित व मानवी आरोग्यास घातक असलेला गोवा गुटखा जप्त केला. यासोबतच आयशर टेम्पो, एक स्विफ्ट कार आणि तीन मोबाईल असा एकूण सुमारे 48 लाख 42 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी संबंधित वाहन कारवाईसाठी ताब्यात घेत असताना आरोपींनी “गाडी सोडून दे, नाहीतर तुला बघून घेऊ” अशी धमकी देत पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. तसेच इतर काही इसमांनीही आरोपींना प्रोत्साहन देत शासकीय कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी फिर्यादी दत्तात्रय कुंभार यांनी दि. 28 मार्च 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून नळदुर्ग पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम 132, 223, 274, 275, 123, 45, 3(5) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम 59 अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

0 Comments