Breaking - येडेश्वरी यात्रेत मंगळसूत्र चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; तिघे अटकेत, 1.31 लाखांचे दागिने जप्त-Dharashiv Crime
धाराशिव, दि.३ : येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी यात्रेत गर्दीचा फायदा घेत महिला भाविकांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश केला असून, या प्रकरणी दोन महिलांसह एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून सुमारे 1 लाख 31 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यात्रेतील गर्दीच्या ठिकाणी पायी गस्त घालत होते. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत आमराई परिसरातील मंदिराजवळ दोन महिला व एक पुरुष संशयास्पद हालचाली करत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत संशयितांवर नजर ठेवली असता ते गर्दीत चोरीचा प्रयत्न करताना आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ तिघांना ताब्यात घेऊन येरमाळा पोलीस ठाण्यात आणले. चौकशीत त्यांनी आपली नावे अनिल शेषेराव शिंदे (वय 34), सुनिता अनिल शिंदे (वय 29) आणि हिराबाई रमेश शिंदे (वय 40, सर्व रा. इंदिरानगर पाथरी, जि. परभणी) अशी सांगितली.
अंगझडतीदरम्यान अनिल शिंदे याच्या खिशातून चार वेगवेगळे सोन्याचे मनी मंगळसूत्र आढळून आले. पुढील चौकशीत आरोपींनी कबुली दिली की, यात्रेतील अंघोळीच्या ठिकाणी असलेल्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने चोरले जात होते आणि ते अनिल शिंदे याच्याकडे जमा केले जात होते.
या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 31 हजार रुपये असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.

0 Comments