संतापजनक घटना: चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; गावात संतापाची लाट, आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल-धाराशिव जिल्हातील घटना -POCSO offence Sexual Assault
धाराशिव (प्रतिनिधी) :कळंब तालुक्यातील एका गावात मानवतेला काळिमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना उघडकीस आली आहे. अवघ्या चार वर्षीय चिमुकलीवर गावातीलच एका तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळंब तालुक्यातील एका गावात दि. 17 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पीडित चिमुकली घराबाहेर खेळत असताना आरोपी तरुणाने तिला जवळ बोलावून घेतले आणि तिचे लैंगिक शोषण केले. या अमानुष प्रकाराची माहिती समजल्यानंतर पीडितेच्या आईने तात्काळ कळंब पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
आईने दिलेल्या प्रथम खबरेवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भा.न्या.सं. कलम 64 तसेच पोक्सो कायद्यान्वये कलम 3, 4, 5(एम) व 6 अंतर्गत गंभीर गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी तत्काळ तपासाची सूत्रे हाती घेतली असून आरोपीला अटक करण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.
या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी पुढे येत आहे.
पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या प्रकरणातील सर्व बाबींचा सखोल छडा लावला जात आहे.

0 Comments