चारित्र्याच्या संशयातून पत्नी-मुलीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या; वडिलांच्याच हातून दुहेरी खून- खुन करून स्वतः आरोपी पोलीस ठाण्यात हजर उमरगा तालुक्यातील थरारक घटना-Umerga Murder Crime News
धाराशिव : जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील बेरडवाडी येथे मंगळवारी पहाटे एक अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत एका पतीने थेट कुऱ्हाडीने वार करून पत्नीचा खून केला. इतक्यावरच न थांबता, हा प्रकार पाहिलेल्या स्वतःच्या 8 वर्षीय मुलीचाही निर्दयीपणे खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अजित अणप्पा वासुदेव याने पहाटेच्या सुमारास पत्नी लिंबाबाई अजित वासुदेव यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. या घटनेची साक्षीदार ठरलेली त्यांची 8 वर्षांची मुलगी मानसी हिने आईवरचा हल्ला पाहिला. मुलगी पोलिसांना सत्य सांगेल या भीतीने आरोपीने तिच्यावरही कुऱ्हाडीने वार करून तिचा खून केला.
घटनास्थळी त्यांचा तीन वर्षांचा मुलगाही उपस्थित होता. आरोपीने त्यालाही मारहाण केली. मात्र, तो लहान असल्याने काही सांगू शकणार नाही असा समज करून त्याचा जीव वाचवला.
या दुहेरी हत्येनंतर आरोपी अजित वासुदेव हा स्वतःच मुरूम पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी व मुलीचा खून झाल्याची खोटी तक्रार देण्यासाठी पोहोचला. मात्र, पोलिसांना त्याच्या बोलण्यात विसंगती जाणवल्याने त्यांनी कसून चौकशी केली. उलट तपासणीदरम्यान आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार तसेच मुरूम पोलीस ठाण्याचे अधिकारी संदीप दहिफळे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी मुरूम येथील शासकीय रुग्णालयात पाठवले.
पोलिसांनी तीन वर्षांच्या मुलाचीही विचारपूस केली असता, त्याने वडिलांकडेच इशारा केल्याने संशय अधिकच बळावला. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली आहे.
या भीषण घटनेमुळे बेरडवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कुटुंबातीलच व्यक्तीकडून झालेल्या या दुहेरी हत्याकांडाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
चारित्र्याच्या संशयातून उद्भवलेला हा दुहेरी खून समाजातील विकृत मानसिकतेचे गंभीर चित्र दाखवणारा असून, अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments