घटस्फोट झाल्याची खोटी थाप, लग्नाचे आमिष अन् ६ वर्षांचा लैंगिक छळ; धाराशिवच्या नराधमाला बेड्या”-Dharashiv Crime News Daily
धाराशिव, दि. २५ (प्रतिनिधी) – सोशल मीडियावरील ओळख, प्रेमाचे नाटक, लग्नाचे खोटे आश्वासन आणि त्यातून एका अविवाहित तरुणीचे तब्बल सहा वर्षे मानसिक, शारीरिक व लैंगिक शोषण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्वतः विवाहित असूनही “माझा घटस्फोट झाला आहे” अशी खोटी माहिती देत एका ३२ वर्षीय तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्यावर वारंवार अत्याचार करणाऱ्या अविनाश पाश्वनाथ गडदे या नराधमास पोलिसांनी अटक केली आहे.
ही घटना धाराशिव शहरातील ग्रीनलँड शाळेजवळील गणेश अपार्टमेंट परिसरातील असून, पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिंडरवरील ओळखीपासून सुरू झाला फसवणुकीचा खेळ
पीडित तरुणी सन २०१४ पासून सोलापूर येथे शासकीय नोकरी करत होती. सन २०२१ मध्ये तिची ओळख टिंडर ॲपवरून अविनाश गडदे याच्याशी झाली. सुरुवातीला त्याने स्वतः विवाहित असलो तरी पत्नीपासून घटस्फोट झाल्याचे सांगत तिचा विश्वास संपादन केला. “मी तुझ्याशी लग्न करणार आहे” असे आश्वासन देत त्याने तिला भावनिकरित्या स्वतःमध्ये गुंतवून घेतले.
यानंतर सोलापूर येथील भाड्याच्या फ्लॅटवर नेऊन तिच्याशी जबरदस्ती शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ती गर्भवती राहिल्यानंतर “आपण लवकरच लग्न करू” असे सांगून आरोपीने तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या व घरीच गर्भपात घडवून आणल्याचे तक्रारीत नमूद आहे.
“तुझ्याशिवाय दुसऱ्याशी लग्न होऊ देणार नाही”
पीडितेच्या आईला कर्करोग झाल्यानंतर कुटुंबीय तिचे लग्न लावून देण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, आरोपी अविनाश गडदे याने तिच्या भावाला व नातेवाईकांना धमक्या देत “तीशी फक्त मीच लग्न करणार” असे सांगितले. इतकेच नव्हे तर पीडितेच्या आईसमोरही लग्नाचे खोटे आश्वासन देऊन कुटुंबीयांची दिशाभूल केली.
दरम्यान, पीडिता मूळ गावी गेल्यानंतर आरोपीने तिच्यावर संशय घेत सतत फोन, धमक्या व बदनामी करण्याची भीती दाखवण्यास सुरुवात केली. “मला भेटली नाहीस तर ऑफिसमध्ये बदनामी करीन, नोकरी घालवीन” अशा धमक्या देत तो तिच्यावर दबाव टाकत होता.
पुणे, मुंबई, हॉटेल-लॉजमध्ये अत्याचार
सन २०२४ मध्ये पीडितेच्या आईचे निधन झाल्यानंतर तिची बदली मुंबई येथे झाली. तरीही आरोपी तिचा पाठलाग करत पुणे व मुंबई येथे तिला भेटण्यास भाग पाडत होता. तक्रारीनुसार, त्याने अनेक वेळा हॉटेल, लॉज तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. विरोध केल्यास मारहाण, शिवीगाळ आणि बदनामीच्या धमक्या दिल्या जात होत्या.
पीडिता पुन्हा गर्भवती राहिल्यानंतर आरोपीने “आळंदीत लग्न करू” असे सांगून तिला पुण्याला बोलावले. मात्र, लग्न न करता पुन्हा गर्भपात घडवून आणल्याचा आरोप आहे.
आत्महत्येच्या धमक्या देत इमोशनल ब्लॅकमेल
पीडितेने संबंध तोडण्याचा प्रयत्न केल्यानंतर आरोपीने “तू भेटली नाहीस तर आत्महत्या करीन” असे म्हणत उंदीर मारण्याचे औषध व झोपेच्या गोळ्या घेतल्याचे व्हिडिओ पाठवले. या माध्यमातून तो तिला भावनिकदृष्ट्या ब्लॅकमेल करत होता. त्यानंतर तिला पुण्याला बोलावून पुन्हा जबरदस्ती संबंध ठेवल्याचे तक्रारीत नमूद आहे.
धक्कादायक सत्य उघड
पीडितेला आरोपीच्या वागण्याचा संशय आल्यानंतर तिने त्याच्या पत्नीशी संपर्क साधला. त्यावेळी “आमचा घटस्फोट झालेला नाही” असे आरोपीच्या पत्नीने स्पष्ट सांगितले. त्यामुळे आरोपीने सुरुवातीपासूनच खोटे बोलून फसवणूक केल्याचे समोर आले.
यानंतर आरोपीने तिच्या कार्यालयात जाऊन “ती माझी पत्नी आहे” असे सांगत बदनामी करण्यास सुरुवात केली. दि. ८ मे २०२६ रोजी तो तिच्या कार्यालयात जाऊन तिला जबरदस्तीने घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे.
पोलिसांकडून गुन्हा दाखल; आरोपी अटकेत
पीडितेच्या तक्रारीवरून अविनाश पाश्वनाथ गडदे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११५ (२), ३५१ (२), ३५२, ३५६ (१) व कलम ६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

0 Comments