दुर्दैवी घटना: फलटण तालुक्यातील मुरूम गावावर दुःखाचा डोंगर; भीषण अपघातात तिन्ही सख्या भावंडांचा दुर्दैवी अंत-Accident News
पुणे, प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील मुरूम गावावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला असून एका कुटुंबातील तिन्ही सख्या भावंडांचा भीषण अपघातात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे. निरा–मोरगाव राज्य मार्गावरील बारामती तालुक्यातील चौधरवाडी फाट्याजवळ दि,६जुन रोजी झालेल्या भीषण अपघातात दोन बहिणींचा जागीच मृत्यू झाला होता, तर गंभीर जखमी झालेल्या त्यांच्या लहान भावानेही उपचारादरम्यान मंग़ळवारी अखेर प्राण सोडले.
मुरूम (ता. फलटण) येथील सेजल ज्ञानेश्वर बोडरे (वय १७), अक्षरा ज्ञानेश्वर बोडरे (वय १५) आणि त्यांचा लहान भाऊ पवन ज्ञानेश्वर बोडरे (वय १२) हे आपल्या मामाच्या गावी मुर्टी येथे जाण्यासाठी इलेक्ट्रिक स्कुटीवरून निघाले होते. मात्र चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या स्कुटीची आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पोची जोरदार समोरासमोर धडक झाली.
अपघात इतका भीषण होता की सेजल आणि अक्षरा या दोन्ही बहिणींनी घटनास्थळीच अखेरचा श्वास घेतला. तर पवन गंभीर जखमी अवस्थेत होता. त्याला तातडीने बारामती येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी पुण्यात हलविण्यात आले होते. डॉक्टरांनी त्याला वाचविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र मंगळवारी (दि. ९) रात्री साडेएकच्या सुमारास पवनचीही प्राणज्योत मालवली.
एका घरातील तिन्ही लेकरांना काळाने हिरावून नेल्याने बोडरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेने मुरूम गावासह संपूर्ण पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात असून गावात शोककळा पसरली आहे.
गावकऱ्यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत, “देवा, अशी वेळ कोणावरही येऊ नये,” अशा भावना व्यक्त केल्या. तिन्ही निष्पाप भावंडांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला असून गावात हळहळ आणि शोकाचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Comments