धाराशिवमध्ये ‘स्पा’च्या आड सुरू होता देहव्यापार; पोलिसांचा धडक छापा, पाच महिलांची सुटका-Dharashiv Crime News Live Update
धाराशिव, दि. २ जून : धाराशिव शहरातील एका स्पा सेंटरच्या आड सुरू असलेल्या कथित अनैतिक देहव्यापारावर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच महिलांची सुटका केली आहे. या प्रकरणी संबंधित व्यवस्थापक, चालक व इतर संबंधित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
मा. पोलीस अधीक्षक श्रीमती रीतू खोखर व अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. धाराशिव शहरातील ओरा (Aura) स्पा सेंटर येथे अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ (PITA) अंतर्गत पोलिसांनी छापा टाकला.
पोलिसांनी प्रथम पंटरच्या माध्यमातून माहितीची खातरजमा केली. त्यानंतर शासकीय पंचांच्या उपस्थितीत छापा टाकून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. छाप्यादरम्यान स्पा सेंटरमध्ये व्यावसायिक लैंगिक शोषण व अनैतिक देहव्यापार सुरू असल्याचे आढळून आले.
या कारवाईत पोलीस निरीक्षक एम. एन. शेळके (AHTU), पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के, पोलीस अंमलदार माने, दूधभाते, कंदळे, नाईकवडी, किवंडे, केवके तसेच महिला पोलीस हवालदार पुरी, जाधव आणि चालक यांनी सहभाग घेतला.
कारवाईदरम्यान एकूण पाच महिलांची सुटका (Rescue) करण्यात आली असून, त्यांना पुढील कायदेशीर व पुनर्वसन प्रक्रियेसाठी संबंधित प्राधिकरणाकडे पाठविण्यात येणार आहे. याप्रकरणी संबंधित व्यवस्थापक, चालक आणि इतर आरोपींविरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक (प्रतिबंध) अधिनियमातील विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम
धाराशिव जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची जबाबदारी परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल मोहिते यांच्याकडे सोपविण्यात आली असून, बेकायदेशीर व अनैतिक व्यवसायांवर कडक नजर ठेवण्यात येत आहे.
यापुढेही अशा अवैध व्यवसायांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस अधीक्षक श्रीमती रीतू खोखर यांनी दिला आहे.

0 Comments