कायमस्वरूपी नोकरीचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल-Naldurg Police Station Crime News
धाराशिव (प्रतिनिधी) : कायमस्वरूपी काम देण्याचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका गावातील २२ वर्षीय महिला (नाव व गाव गोपनीय) हिला आरोपी तरुणाने कायमस्वरूपी काम देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर दि. ३१ मे २०२६ रोजी रात्री सुमारे ९.३० वाजण्याच्या सुमारास आरोपीने तिला मोटारसायकलवर बसवून एका मोकळ्या व निर्जन पटांगणात नेले.
तेथे अंधाराचा फायदा घेत आरोपीने महिलेला धमकावून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर कोणालाही याबाबत माहिती देऊ नकोस, तसेच तुला कायमस्वरूपी सांभाळ करेन, असे सांगून आरोपीने पीडितेला पुन्हा मोटारसायकलवर बसवून रस्त्यावर सोडले व तेथून पसार झाला.
घटनेनंतर पीडित महिलेने धैर्य दाखवत दि. २ जून २०२६ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. तिच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ व ३५१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत. प्रकरणाचा पुढील तपास नळदुर्ग पोलीस करीत आहेत.

0 Comments