रूम भाड्याने देण्याच्या बहाण्याने तरुणीवर अत्याचार; शीतपेयात मद्य मिसळून गुंगी आणल्याचा आरोप-धाराशिव शहरातील घटना-Dharashiv Crime News Live Update
धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका 34 वर्षीय महिलेवर रूम भाड्याने देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून एका तरुणाविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला दि. 9 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या संपर्कात आली होती. आरोपीने तिला रूम भाड्याने करून देतो, असे सांगून आपल्या म्हशीच्या गोठ्यावर बोलावले. त्यानंतर जेवण करण्याच्या बहाण्याने एका हॉटेलमध्ये नेले. तेथे शीतपेयामध्ये मद्य मिसळून पाजल्याने पीडितेला गुंगी आली. याच संधीचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
घटनेनंतर पीडित महिलेने धैर्याने पुढे येत दि. 10 जून 2026 रोजी धाराशिव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या प्रथम खबर अहवालावरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 64(2) तसेच इतर संबंधित कलमे आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी आणि घटनेच्या सर्व पैलूंची चौकशी करण्यासाठी पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली.

0 Comments