शेअर बाजारातील कोट्यवधींच्या तोट्याने उद्ध्वस्त कुटुंब; बार्शी तालुक्यात मुख्याध्यापकाने पत्नी व दोन मुलांना विष देऊन स्वतःही संपवले जीवन-Solapur Crime News -Barashi share Market
बार्शी | प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील हत्तीज गावात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक असलेल्या योगेश पाटील यांनी कथित आर्थिक विवंचना आणि शेअर बाजारातील मोठ्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर पत्नी आणि दोन मुलांना विष देऊन त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या घटनेत योगेश पाटील, त्यांची पत्नी माधुरी पाटील तसेच मुलगे अथर्व पाटील आणि शिवांश पाटील यांचा मृत्यू झाला आहे. एका सुशिक्षित आणि स्थिर कुटुंबावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे बार्शी तालुक्यासह परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, योगेश पाटील हे नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक(Headmaster Suicide News) म्हणून कार्यरत होते. काही काळापासून ते शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असल्याचे समोर आले आहे. मात्र बाजारातील व्यवहारांमध्ये त्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. हे नुकसान भरून काढण्यासाठी आणि आर्थिक व्यवहार टिकवण्यासाठी त्यांनी विविध माध्यमांतून सुमारे 1 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.
कर्जाचा वाढता ताण, आर्थिक अडचणी आणि वसुलीचा दबाव यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. याच पार्श्वभूमीवर त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.
आधी कुटुंबाला विष, नंतर स्वतः गळफास
घटनेच्या दिवशी योगेश पाटील आपल्या मूळ गावी हत्तीज येथे आले होते. येथे त्यांनी आधी पत्नी आणि दोन्ही मुलांना विष दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
घटनास्थळी 22 पानी चिठ्ठी जप्त
पोलिसांना तपासादरम्यान घटनास्थळी तब्बल 22 पानांची हस्तलिखित चिठ्ठी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीतील मजकूर, आर्थिक व्यवहार, कर्जाची माहिती आणि इतर तांत्रिक पुरावे यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून अधिकृत अहवालाची प्रतीक्षा आहे.
समाजासमोर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न
या घटनेनंतर आर्थिक नुकसान, गुंतवणुकीचा ताण आणि मानसिक दबाव यांचा परिणाम किती गंभीर होऊ शकतो, यावर चर्चा सुरू झाली आहे. आर्थिक अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्वतःचा किंवा इतरांचा जीव घेणे हा कोणत्याही समस्येचा मार्ग नसतो. संकटाच्या काळात कुटुंब, मित्र, तज्ज्ञ आणि संबंधित यंत्रणांची मदत घेणे महत्त्वाचे ठरते.

0 Comments