ढोकीत शासकीय फळरोपवाटिकेत अतिक्रमणाचा वाद; कृषी अधिकाऱ्यास धक्काबुक्की, कर्मचाऱ्यांना मारहाण
शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी २२ जणांविरुद्ध ढोकी पोलिसांत गुन्हा दाखल
धाराशिव : जिल्हा फळरोपवाटिका, ढोकी येथे शासकीय कामकाज सुरू असताना बेकायदेशीर अतिक्रमण केल्याच्या वादातून कृषी अधिकाऱ्यास धक्काबुक्की तसेच रखवालदारांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते १० वाजण्याच्या सुमारास जिल्हा फळरोपवाटिका, ढोकी येथे फिर्यादी शशिकांत लक्ष्मण बारबोले (वय ५६, व्यवसाय कृषी अधिकारी, जिल्हा फळरोपवाटिका ढोकी, रा. बार्शी, जि. सोलापूर; सध्या रा. ढोकी) हे शासकीय कामकाज करत होते.
यावेळी आरोपींनी जिल्हा फळरोपवाटिकेच्या ठिकाणी बेकायदेशीर अतिक्रमण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. या प्रकरणात आरोपींनी फिर्यादी बारबोले यांच्या शर्टाला ओढून धक्काबुक्की केली तसेच त्यांना कर्तव्य बजावण्यापासून परावृत्त केल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय, फळरोपवाटिकेत रखवालदार म्हणून कार्यरत असलेल्या गजेंद्र परीट, गणेश गडकर आणि निलेश पुदाले यांच्या अंगावरील कपडे फाडून त्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यात आली. तसेच त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
या घटनेमुळे शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण झाल्याचे पोलिस तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादी शशिकांत बारबोले यांनी दि. २६ सप्टेंबर रोजी दिलेल्या प्रथम खबरीवरून ढोकी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२१(१), १३२, १८९(२), १९१(२), १९० आणि ३२९(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ढोकी पोलिस करीत आहेत.
आरोपींची नावे : तोळाबाई बाबासाहेब चव्हाण, साखरबाई सुनिल चव्हाण, शेवंताबाई रामदास चव्हाण, पिंकी महादेव शिंदे, गायाबाई बालाजी काळे, सखुबाई बजरंग चव्हाण, सविता भिमा काळे, लताबाई लाला काळे, जनाबाई दिलीप चव्हाण, सुमनबाई गोविंद शिंदे, पदमीनबाई दत्ता चव्हाण, रेखाबाई विलास चव्हाण, जनाबाई नवसाजी चव्हाण, मालनबाई बप्पा चव्हाण, लता वसंत शिंदे, मनिषा पप्पु चव्हाण, शाहुबाई बाबु पवार, सुनिता सुभाष चव्हाण, तोळाबाई नाना चव्हाण व अरुण चव्हाण, सर्व रा. ढोकी, ता. जि. धाराशिव.

0 Comments