उस्मानाबाद: जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमासह अनुदानाची रक्कम तात्काळ वितरित करण्यात यावी या मागणीसाठी आमदार कैलास घाडगे पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण आंदोलन बुधवार (दि २६) तिसऱ्या दिवशी सुरूच होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सन २०२० च्या पीक विम्याचे ५३१ कोटी रुपये जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तात्काळ जमा करावेत, या रकमेतून कर्ज वसुली करू नये.सन २०२०-२१ पिक विम्याची ५० टक्के म्हणजेच ३८८ कोटी रुपयांची रक्कम ६ लाख ६७ हजार २८७ शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा करावी, सततचा पाऊस, अतिवृष्टी व कीड रोगराईच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या पीक नुसकासानीपोटी, २ लाख ४८ हजार ८०१ शेतकऱ्यांना २४८ कोटीचे अनुदान वितरित करावे, शेतकऱ्यांच्या हक्काचे पिकविमा अनुदानाचे जवळपास १२०० कोटी रुपये तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावीत या मागणीसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनानं आ. पाटील यांना उपोषण मागे घेण्यास चर्चा केली मात्र ठाम आश्वासन दिल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका आ.पाटील यांनी व्यक्त केली. आज या उपोषणाचा तिसरा दिवस आहे या उपोषणाला पाठिंबा म्हणून काही महिलांनी आ.पाटील यांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. या आमरण उपोषणास विविध संघटना, संस्था, समित्या,पक्ष आदींनी जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.
0 Comments