बेदाणा उत्पादकांना प्रति टन एक लाख रुपये अनुदान द्या
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांची मागणी !
सांगली: अलीकडे जिल्ह्यामध्ये निसर्गाच्या लहरीपणा, गडगडलेले दर यामुळे द्राक्षाच्या भागांना मोठा फटका बसला आहे यामुळे द्राक्ष उत्पादक व बेदाणा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात संपला आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये अनुदान व बेदाणा उत्पादकांना प्रति टन एक लाख रुपये अनुदान द्या यासह विविध मागण्यासाठी बुधवार दिनांक 17 मे रोजी सकाळी 10 वाजता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली.
खराडे यांनी म्हटले की सांगली जिल्हा हा द्राक्ष उत्पादक व बेदाणा उत्पादक म्हणून ओळखला जातो . द्राक्ष उत्पादकांना अनेक कारणामुळे प्रचंड नुकसान झाले आहे चार किलो ची पेटी 70 ते 100 रुपयांना विकली, द्राक्षाला फारच कवडीमोल दर मिळाला आहे, चुरमुरे 120 रुपये किलो आणि द्राक्ष 25 ते 30 रुपये किलो हे वास्तव आहे. द्राक्षाला योग्य दर मिळत नाही म्हणून शेतकऱ्यांनी बेदाणा तयार केला. पण बेदाणा उत्पादन यंदा प्रचंड झाले, दरवर्षी अठरा ते वीस हजार गाडी बेदाणे उत्पादन होते. पण चालू वर्षी ते 30 हजार गाडी पर्यंत गेले आहे. एक गाडी म्हणजे 10 टन ,बेदाण्याचे सुमारे तीन लाख टन उत्पादन झाले आहे.
त्यामुळे मिरज आणि तासगाव तालुक्यातील सर्व कोल्ड स्टोरेज फुल्ल झाली आहेत. बेदाणा ठेवायला जागा शिल्लक नाही अशी वास्तव परिस्थिती झाली आहे. त्यातच बेदण्याचा दर पडला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याची गरज आहे. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देण्यात आले आहे, त्याच धर्तीवर द्राक्ष व बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना एक लाख रुपये अनुदान द्या ही प्रमुख मागणी आहे.
द्राक्ष व बेदाणा निर्मिती जिल्ह्याच्या अर्थकारणाचा मुख्य स्रोत आहे. द्राक्ष शेती टिकली पाहिजे ,वाढली पाहिजे, द्राक्ष उत्पादक शेतकरी टिकला पाहिजे , अनेक शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहेत. त्यांना आधार देण्याची सर्वांची जबाबदारी आहे . म्हणून आंदोलनाच्या माध्यमातून हा प्रश्न ऐरणीवर आणणार याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिली आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना एकरी एक लाख रुपये अनुदान द्या
बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन एक लाख रुपये अनुदान द्द्या
द्राक्ष बेदाणा बाबत पणन महामंडळाने जाहिरात करावी.
दलालांना परवाना सक्तीचा करावा
बेदाणा उधळण शंभर टक्के बंद करावी
बेदाणा बॉक्सचे निम्मे पैसे शेतकऱ्यांना द्यावेत
बेदाणा पेमेंट 21 दिवसात द्यावेत
कीटकनाशकाच्या किमती कमी कराव्यात
शेतकऱ्यांना कमी दराने कर्ज पुरवठा करावा
बेदाणा पणन नियमनात आणावा.
0 Comments