पीकलॅन्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने वरुडा येथे सोयाबीन लागवड तंत्रज्ञान विषयावर शेतीशाळा
शेतकर्यांनी सोयाबीन पेरणी करताना बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा-तालुका कृषी अधिकारी जाधव.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
धाराशिव :- पाऊस लांबल्यामुळे खरीप हंगामाच्या पेरणीला उशीर झाला आहे. त्यामुळे शेतकर्यांचा सोयाबीन लागवडीकडे कल वाढणार आहे. सोयाबीन पेरणीवरील खर्च कमी करण्यासाठी शेतकर्यांनी बीबीएफ तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी.आर.जाधव यांनी केले.
धाराशिव तालुक्यातील वरूडा येथे पीकलॅन्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने कृषी विभाग व आत्माच्या सहयोगाने स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतीशाळेचे शुक्रवार, दि.23 जून रोजी आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री.नागेश उगलमुगले, मंडळ कृषी अधिकारी ऐनवळे, पीकलॅन्ड कंपनीचे संचालक विक्रांत पाटील यांची उपस्थिती होती.
शेतीशाळेत मार्गदर्शन करताना तालुका कृषी अधिकारी श्री.जाधव यांनी खरीप हंगामातील पिके, पेरणीनंतर घ्यावयाची काळजी, सोयाबीन उगवल्यानंतर रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली. उपस्थित मान्यवरांनीही यावेळी सोयाबीन लागवड तंत्रज्ञान या विषयी शेतकर्यांना मार्गदर्शन केले.
प्रारंभी कंपनीच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. संचालक विक्रांत पाटील यांनी पीकलॅन्ड फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या वतीने शेतकर्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमात कंपनीच्या 30 सभासद शेतकर्यांना सोयाबीन बियाणाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वरूडा गावातील महिला, पुरूष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments