बँक खात्यावरील पिकविम्याची जमा झालेली रक्कम पूर्ण न मिळाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार , शेतकरी महिलेचा उपोषणाचा इशारा
प्रतिनिधी रूपेश डोलारे धाराशिव
उस्मानाबाद : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तामलवाडी शाखेत बँकेत पैसे नाहीत, खात्यातील रक्कम देता येत नाही , उलटसुलट बोलुन हाकलुन देत असल्याबाबत शेतकरी महिलेने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की मी सलीमा बाबा शेख मोलमजुरी करुन माझी व माझ्या कुटुंबाची उपजिवीका भागविते. माझ्या नावे मौजे पिंपळा बु. ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद येथे जमीन गट नं. 13 क्षेत्र 6 एकर जमीन असुन सदर जमीनीचा पिक विमा साल सन 2020-21 साठी भरलेला होता. सदरच्या साल सन 2020-21 चा पिक विमा माझे खाते असलेल्या उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा तामलवाडी ता. तुळजापुर जि. उस्मानाबाद येथील खाते नं. 10305/8543 वरती दिनांक 01/01/2021 रोजी रक्कम रुपये 25,900/- जमा झालेली होती. त्या जमा झालेल्या रकमेपैकी रक्कम रुपये 6470/- मी उचलेले आहेत. उर्वरीत रक्कम मला अद्याप दिलेली नाही. त्याबद्दल मी विचारले असता बँकेमध्ये पैसे नाहीत त्यामुळे तुम्हांला रक्कम देता येत नाही. परंतु मला घरगुती अडचणीमुळे तसेच दवाखान्यामुळे पैशाची नितांत आवश्यकता आहे. सदर माझ्या खात्यावर रक्कम उचलण्यासाठी मी सतत दोन वर्षे चकरा मारत आहे. तरीपण मला सदर बँक पैसे देत नाहीत. उलटसुलट बोलुन मला हाकलुन देत आहेत. माझ्या डोळयाचे ऑपरेशन करण्यासाठी पैशाची खुप आवश्यकता आहे. तरी सदरची रक्कम मला लवकरात लवकर मिळावी अन्यथा मला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यावाचुन पर्याय राहणार नाही. खात्यावरील पैसे बँक देत नसल्यामुळे त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी ही अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
0 Comments