तुळजापुर तालुक्यातील चिवरी परिसरात पावसाअभावी पिके सुकू लागली
चिवरी: तुळजापूर तालुक्यातील चिवरी परिसरात मागील पंधरा दिवसापासून पावसाने प्रदीर्घ उघाड दिली आहे. त्यामुळे खरिपातील कोवळ्या पिकांनी दुपार धरायला सुरुवात केली आहे, डोळ्यादेखत पिके माना टाकत असल्याने शेतकऱ्यासमोर दुष्काळाची सावट गडद होताना दिसत आहे. चिवरी परिसरातील येवती, आरळी, काळेगाव, चिंचोली, बसवंतवाडी,आदी परिसरात पावसाच्या उघडपीमुळे पिकांनी माना टाकल्याने या पिकाकडे पाहून शेतकऱ्यांना दुष्काळाची गडद सावटाची भीती वाटू लागली आहे.
चिवरी परिसरात अगोदरच पेरण्या उशिरा झाल्या, सुरुवातीत पेरण्या होतात की नाही? अशी अवस्था निर्माण झाली होती , पण अल्पशा पावसावर कशाबशा पेरण्या शेतकऱ्याने उरकल्या मात्र मागील पंधरा दिवसापासून पावसाने मोठा खंड दिल्याने कोवळी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. परिसरातील ज्या शेतकऱ्याकडे सिंचनाच्या सुविधा नसल्याने डोळ्यासमोर पिके वाळत आहेत. ज्याच्याकडे सिंचनाची सुविधा आहे ते शेतकरी पिके वाचवण्यासाठी धडपड करताना पाहायला मिळत आहे.
एकंदरीत परिसरातील शेतकऱ्यांना दरवर्षी कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षी तर पेरणीवर केलेला खर्चही निघतो की नाही असा प्रश्न शेतकऱ्यांनी पडला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून अशीच परिस्थिती राहिली तर, घरसंसाराचा गाडा कसा चालवायचा असा प्रश्न परिसरातील शेतकऱ्यांना सतावु लागला आहे.
0 Comments