रेशीम शेतकऱ्यांसाठी सिल्क ॲप तयार करण्यात येणार- जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे
प्रतिनिधि रूपेश डोलारे उस्मानाबाद
उस्मानाबाद,दि,९ : रेशीम शेती व्यवसाय हा शेतीस पुरक व्यवसाय आहे. अत्यंत कमी खर्चात व शेतकऱ्यांकडे उपलब्ध असलेल्या साहित्यातून करता येतो. जिल्ह्यात तुती लागवड व रेशीम शेतीस वाव देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून रेशीम उत्पादकांसाठी “सिल्क ॲप” तयार करण्यात येत असून याद्वारे रेशीमची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना नक्कीच लाभ होईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी आज केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हा रेशीम कार्यालय आणि रोजगार हमी योजना यांची आढावा बैठक घेताना जिल्हाधिकारी बोलत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा रेशीम अधिकारी आरती वाकुरे, जिल्ह्यातील सर्व मनरेगा अंतर्गत तांत्रिक सहाय्यक व रेशीम कार्यालयातील क्षेत्र सहाय्यक तसेच सर्व तहसीलदार दूरदृष्यीय प्रणालीद्वारे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे यांनी जिल्ह्यात तुती लागवड वाढविण्यासाठी सर्व तांत्रिक सहाय्यकांनी व रेशीम कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने काम करण्याचे निर्देश दिले. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रेशीम शेतीसाठी प्रोत्साहीत करण्यासाठी नियोजनबध्द पध्दतीने शेतकऱ्यांचे प्रबोधन आणि तुती लागवडीचे फायद्याबाबत कळवावे. दिलेल्या कामात हलगर्जी निदर्शनास आल्यास किंवा प्रगती न दिसल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असेही निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी यावेळी दिले.
0 Comments