शेतीमालाचा भाव स्वतः ठरविल्यानंतरच शेतकरी समृद्ध होईल - डॉ.बल्हारा , जनता सरकार मोर्चाच्या शेतकरी प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद.
धाराशिव : शेतकरी स्वतःच्या मालाचा भाव स्वतः ठरवत नाहीत. त्यामुळेच शेतकरी अडचणीत आलेला आहे. शेतकरी जेव्हा कंपन्यांप्रमाणे त्यांच्या मालाचा भाव ठरवेल तेव्हाच तेव्हाच शेतकरी आणि शेती व्यवसायाला समृद्धी येईल, असे मत पंजाब येथील डॉ. देवेंद्र बल्हारा यांनी व्यक्त केले.
जनता सरकार मोर्चाच्या वतीने धाराशिव येथील स्वामी समर्थ मंगल कार्यालयात 1 ते 3 सप्टेंबर या कालावधीत तीन दिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. रविवारी प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जनता सरकार मोर्चाचे नवनाथ दुधाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. बल्हारा म्हणाले की, कर्ज काढणे हा गुन्हा नाही. शेतकरी, व्यापारी, वाहनचालक, मालक यांनी कर्जाचा ताण घेऊ नये. तुमच्यावर बँकेचे कर्ज आहे मात्र तुम्ही फेडू शकत नसाल किंवा बँकेने तुमचे घर, गाडी, शेतावर जप्ती आणली असेल तर आत्महत्या करू नका. कोणत्याही बँकेला तुमचे घर, गाडी, शेती जप्त करता येत नाही, यासाठी तुम्ही कायदा, नियम समजून घेऊन खंबीर होण्याची गरज आहे, असे सांगून त्यांनी कर्ज, रुपयाचा इतिहास, भारताच्या संस्कृतीबाबतही मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान भारतीय रुपयाचा इतिहास, भारतीय शिक्षण, शेतीचे ग्लोबल वार्मिंगमुळे होणारे नुकसान, भारतीय संस्कृतीचा होत चाललेला र्हास, भारतीय संविधानात जबरदस्तीने केले जाणारे बदल, बँकांचे मायाजाळ आणि आरोग्याबाबतच्या विविध समजुती, समाजव्यवस्था कशी असावी यासह इतर विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी सुनील शर्मा, संजीव कुमार, सोमदेव आर्य, मोहित कुमार यांनीही शेतकरी व व्यापार्यांना मार्गदर्शन केले. विविध बँकांतून काढलेले कर्ज व राज्यघटनेनुसार आपल्याला मिळालेल्या अधिकारांबाबत त्यांनी सविस्तर माहिती दिली.
नागरिकांनी पाणी, जमीन, जंगल आणि जनावरे कशी वाचवायची, यावर अधिकार गावाचा असतो, तो सरकारकडे नव्हे तर गावकर्यांकडेच असला पाहिजे याबाबत कायदेशीर मार्गदर्शनही यायावेळी करण्यात आले. सध्याच्या स्थितीत शिक्षण आरोग्य, न्याय, शेतीव्यवस्था राजकीय चक्रव्युहात अडकली आहे. यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. प्रशिक्षणात जिल्ह्यातील शेतकरी, व्यापारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments