उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये प्रवाशी वाहतूक करणारी बोट बुडाली ; सात प्रवाशी बेपत्ता
पुणे : उजनी धरणाच्या बॅक वॉटर मध्ये आज मंगळवारी (दि. २१) सायंकाळच्या दरम्यान वादळी वाऱ्यामुळे प्रवासी बोट बुडाली. इंदापूर तालुक्यातील कळाशी येथून सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील कुगावकडे ही बोट प्रवास करत होती. यामध्ये सात जण बुडाल्याचे प्राथमिक माहिती मिळत आहे. यातून एकाने पोहत आपला जीव वाचवला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, कळाशीहुन प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटीमध्ये एकूण तीन पुरुष, दोन महिला, दोन लहान मुली असे ७ प्रवासी आणि बोट चालक असे एकुण ८ जण प्रवास करत होते. यापैकी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल डोंगरे हे पोहत कळाशी (ता. इंदापूर) या ठिकाणी आले आहेत.
सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वादळी वारा व पावसाने हजेरी लावल्याने या वादळी वाऱ्याच्या वेगाने आणि पाण्याच्या लाटांनी ही बोट पलटी झाली असल्याचा अंदाज आहे. घटना समजतात बचाव कार्यासाठी महसूल पोलीस प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थ पोहचले आहेत.
पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे पोहत पोहत पोहोचले नदीच्या काठावर
विशेष म्हणजे या बोटीतून ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेतील पोलीस उपनिरीक्षक राहुल डोंगरे हे देखील प्रवास करत होते. बोट पलटी झाल्यानंतर ते पोहत-पोहोत कळाशी गावच्या काठावर पोहोचले आहेत. राहुल डोंगरे हे काठावर पोहोचल्यांतर या घटनेचा उलगडा झाला आहे.
NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच NDRF च्या टीमकडून उजनी जलाशयात शोध मोहीम युद्ध पातळीवर सुरु करण्यात आली होती. अद्यापही शोध मोहिम सुरुच आहे. बोट जरी सापडली असली तरी अद्यापही प्रवाशी बेपत्ताच आहेत. NDRF कडून प्रवाशी शोधण्याचं काम सुरु आहे.
बुडालेल्या प्रवाशांची नावे
गोकूळ दत्तात्रय जाधव (वय 30), कोमल गोकूळ जाधव (वय 25), शुभम गोकूळ जाधव (वय दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (वय 3, रा. झरे, ता. करमाळा, जि. सोलापूर), कुगाव येथील अनुराग अवघडे (वय 35) व गौरव डोंगरे (वय 16). हे सर्व प्रवाशी बुडाले आहे. अजून यामधील कोणात्याही प्रवाशाचा शोध लागला नाही. जलाशयात बुडालेले सर्व 6 प्रवासी करमाळा तालुक्यातील आहेत. दरम्यान, बुडालेल्या प्रवाशांमध्ये आदिनाथ साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे यांचा मुलगा गौरव डोंगरे याचाही समावेश आहे.
तसेच कुगावं येथील रहिवासी असलेला बोट चालक पाण्यात बेपत्ता आहेत .
0 Comments