शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता ! मान्सून 'या' भागात झाला दाखल|
नैऋत्य मान्सून वारे मालदीव, कोमोरिनच्या काही भागात, बंगालच्या उपसागराच्या काही भागात, निकोबार बेटे आणि दक्षिण अंदमान समुद्रात आज (दि.१९) दाखल झाले आहेत. अशी मान्सून संदर्भातील माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने शनिवारी (दि.१८) दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४८ तासांत मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. परंतु अंदाजाच्या काही तासांपूर्वीच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. सर्वसाधारण २२ मे च्या दरम्यान मान्सूनअदमानात येतो, पण यंदा तीन दिवस आधीच मान्सून अंदमान समुद्रात दाखल झाला आहे.
मान्सूनची ठळक वैशिष्ट्ये:
मान्सून साधारणपणे १ जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होतो.
यंदा एक दिवस आधीच म्हणजे ३१ मे रोजी मान्सून केरळमध्ये
१५ जुलै पर्यंत मान्सून संपूर्ण देश व्यापतो.
यंदा देशात मान्सून दमदार बरसणार . सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज.
येत्या मान्सून हंगामात ‘ला निना’ परतणार, पाऊस धो-धो बरसणार.
२४ मे रोजी बंगाल उपसागराचा संपूर्ण भाग व्यापणार
बुधवार २२ मे दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून हे क्षेत्र सुरुवातीला हळूहळू ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. तर शुक्रवार २४ मेच्या सुमारास बंगालच्या उपसागराच्या मध्यवर्ती भागांवर दबाव निर्माण होण्याची शक्यता असून, २४ मे दरम्यान मान्सून संपूर्ण बंगालचा उपसागर व्यापेल, असे देखील हवामानशास्त्र विभागाने स्पष्ट केले आहे.
‘या’ तारखेला केरळमध्ये होणार दाखल
दक्षिण अंदमानच्या समुद्रात मान्सून दाखल झाला आहे. दरम्यान तो हळूहळू पुढे सरकून ३१ मे रोजी केरळमध्ये येणार आहे. नेहमीपेक्षा एक दिवस आधीच मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची अधिक शक्यता आहे. शुक्रवार ३१ मे रोजी केरळमध्ये मान्सूनचे आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली आहे.
‘या’ राज्यात २१ मे पर्यंत अतिमुसळधार
भारतीय दक्षिण द्वीपकल्पीय प्रदेशातील बहुतांश राज्यात रविवार १९ मे ते मंगळवार २१ मे रोजी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. दक्षिणेतील तमिळनाडू आणि केरळमध्ये या दरम्यान अत्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
0 Comments