धाराशिव : श्रीपतराव भोसले उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये सी. ए. फाउंडेशन व पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्दघाटन
धाराशिव: श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, धाराशिव येथे आज दिनांक १५ जुलै रोजी खास वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सी. ए. फाउंडेशन वर्गाचे आणि कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. स्वप्निल राजाराम राठोड साहेब यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अतिथी, मान्यवरांचा व या नव्याने सुरू होणाऱ्या वर्गाला अध्यापन करणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. उद्घाटनाच्या निमित्ताने बोलताना श्री. राठोड म्हणाले, की स्पर्धा परीक्षा ही प्रश्न उत्तरांची नसते तर ती परीक्षार्थीच्या आकलनाची असते. स्पर्धा परीक्षांची तयारी करत असताना सोशल मीडियापासून लांब राहण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी कुठलेही सण, समारंभामध्ये वेळ न घालवता यशासाठी झटलं पाहिजे असेही ते म्हणाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले संस्थेचे प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख सर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात श्रीपतराव भोसले हे सी. ए. फाउंडेशनचे वर्ग चालवणारे व मोफत पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण राबवणारे जिल्ह्यातील एकमेव कॉलेज असल्याचे सांगितले. या वर्गांना अध्यापन करण्यासाठी त्या-त्या क्षेत्रामध्ये तज्ञ व अनुभवी असलेले शिक्षक नेमल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लाभलेले कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे सर यांनी या कॉलेजमधून शिकून आज पर्यंत झालेले अधिकारी याची उजळणी केली. तसेच कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे सर यांचीही विशेष उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. डी. व्ही. जाधव सर तर आभार सीए फाउंडेशनचे प्रमुख श्री. आर. एस. भोसले यांनी मानले.
या नव्याने सुरू करण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या वाटचालीसाठी संस्थाध्यक्ष श्री. सुधीर आण्णा पाटील सर, आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आदित्य पाटील सर, संस्थेच्या सरचिटणीस सौ. प्रेमाताई सुधीर पाटील, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे सर आदींनी शुभेच्छा दिल्या.
0 Comments