तुळजापुर : भाविकांची नवरात्र काळात गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी- जिल्हाधिकारी डॉ.ओम्बासे-
शारदीय नवरात्र महोत्सव २०२४ पूर्व तयारीचा आढावा
धाराशिव दि. २४ :- ऑक्टोबर महिन्यात दि. 3 ते 18 या कालावधीत श्री.तुळजाभवानी मातेचा शारदीय नवरात्र महोत्सव होणार आहे.यादरम्यान विविध विभागाकडून यात्रेत व्यवस्था करण्यात येते.ही यात्रा व्यवस्था उत्तम असण्यासह महोत्सवादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता यंत्रणांनी घ्यावी,असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले.
श्री.तुळजाभवानी मंदीर संस्थान सभागृह, तुळजापूर येथे आगामी शारदीय महोत्सवासाठी 23 ऑगस्ट रोजी आयोजित आढावा बैठकीत डॉ.ओंबासे बोलत होते.
यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष,पोलिस अधिक्षक संजय जाधव,उपविभागीय अधिकारी श्री.संजय डव्हाळे,अति.पोलिस अधिक्षक गौहर हसन,उपविभागीय अधिकारी संजय डव्हाळे,उपविभागीय पोलिस अधिकारी निलेश देशमुख,तहसीलदार अरविंद बोळंगे, तुळजाभवानी मंदीर प्रशासकीय व्यवस्थापक तथा तहसीलदार माया माने, सहाय्यक धार्मिक व्यवस्थापक सिध्देश्वर इंतुले यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ.ओंबासे म्हणाले,येणाऱ्या भाविकांना विविध सुचना देण्यात येवून तुळजापूरकडे येणाऱ्या सर्व रस्त्यावर महामार्गावर तसे फलक लावण्यात यावे.शहरात अनेक रिक्षा अनधिकृत असून त्या गॅसवर चालविण्यात येतात. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे.तसेच प्रवाशांची फसवणूक होणार नाही यासाठी रिक्षांचे दरपत्रक रिक्षा स्टँडवर लावण्यासह प्रवाशांची संख्या निश्चित करावी.संभाव्य अपघाताच्या ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाईच्या सुचना यावेळी त्यांनी सहाय्यक प्रादेशिक अधिकारी यांना दिल्या.
नगर परिषदेने शहरात बॅरेकेटींग लावणे, आवश्यक त्या ठिकाणी जंतूनाशक पावडरची फवारणी करणे,शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करुन स्ट्रीट लाईट लावणे,श्री घाटशीळ,पापनाश व महाव्दार परिसरात 24 तास स्वच्छता कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात यावी असे सांगून डॉ. ओंबासे म्हणाले,प्रधिकरणावेळी करण्यात आलेल्या कामामुळे पोल काढण्यात आले आहेत,अशा ठिकाणी पोल बसवून घ्यावे. शहरात फिरणारी मोकाट जनावरे,श्वान व वराह यांचा बंदोबस्त करावा.कोंडवाडयाची व्यवस्था करावी. तसेच जनावरे मालकाकडून दंड वसुल करावा असे निर्देश तुळजापुर नागरपालिकेला डॉ.ओंबासे यांनी दिले.
रस्त्यांच्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागांनी आपआपली जबाबदारी पार पाडावी असे सांगून डॉ.ओंबासे म्हणाले की,तुळजापूर शहराकडे येणाऱ्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करुन घ्यावी,तसेच रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढून तात्काळ त्या ठिकाणी मुरुम टाकण्याची व्यवस्था करावी.भाविकांना मार्गदर्शनासाठी विविध स्वरुपाचे फलक लावावेत.
शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान विद्युत पुरवठा खंडीत होणार नाही या दक्षतेसह या काळात एक उपअभियंता व दोन वायरमन यांची स्वतंत्रपणे नियुक्ती करण्यासह मंदीरासाठी करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठयाचा विजपुरवठा खंडीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश देऊन डॉ.ओंबासे म्हणाले, ट्रान्सफार्मरवर येणारा लोड क्षमतेपेक्षा जास्त नसावा. शहरातील विजेचे केबल,बॉक्स,मेन बॉक्स उघडे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने बसेसची व्यवस्था करुन बसमुळे वाहतूक विस्कळीत होणार नाही याची दक्षता घ्यावी.इतर सर्व विभागांना नेमून दिलेली कामे वेळेत पूर्ण करुन भाविकांची गैरसोय होणार नाही. यांची दक्षता घेण्याच्या सुचना यावेळी दिल्या.
यावेळी पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, तुळजापूरचे आगार व्यवस्थापक रामेश्वर शिंदे,मंदीर संस्थानचे अधिकारी - कर्मचारी तसेच विविध यंत्रणांचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी केली चर्चा अन सुटला प्रश्न…
शारदीय नवरात्र महोत्सवादरम्यान स्थानिकांना आपल्या दुचाकी घराकडे नेण्याचा मोठा प्रश्न निर्माण होत होता. यामुळे सुवर्णेश्वर गणपती मंदीराजवळ अनेक वेळा वाद निर्माण होत होता. यामुळे येथे बॅरेकेटींग लावण्यासाठी या परिसरातील नागरिकांचा विरोध होता. या आढावा बैठकीत ज्या नागरिकांचा विरोध होता त्यांना बोलावून त्यांचेशी चर्चा केली. आता त्या ठिकाणी तात्पुरते बॅरेकेटींग झुलता पुल बसविण्यात येणार आहे.यामुळे स्थानिकांना येथे येणे-जाणेसाठी आता अडचण येणार नाही.
बोगस पुजाऱ्यांवर होणार कारवाई
मंदीरात अनुचित प्रकार घडू नये,तसेच भाविकांची फसवणूक होवू नये यासाठी आता बोगस पुजाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.यासाठी तीनही पुजारी मंडळाच्या याद्यांची पुर्नतपासणी करण्यात येवून त्यांना क्यु आर कार्ड असलेले ओळखपत्र देण्यात येणार आहे.
कुंकूवाऐवजी उधळण्यात येणार फुले
शारदीय नवरात्र महोत्सवाचा सिमोल्लंघन हा महत्वाचा उत्सव असतो. सिमोल्लंघनावेळी काहीजण मंदीरावर चढून पालखीवर पोत्याने कुंकू उधळल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण होते.यामुळे आता पालखीवर कुंकूऐवजी फुले उधळण्यात येणार आहे.
0 Comments