Hot Posts

6/recent/ticker-posts

चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची दुरावस्था

चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची दुरावस्था ग्रामस्थांसह भाविकांचे वाहनधारकाचे हाल ! यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची मागणी


चिवरी : तुळजापूर तालुक्यातील चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. येथील नळदुर्ग -तुळजापूर महामार्गावरील चिवरी पाटी ते महालक्ष्मी मंदिर रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकासह भाविकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मंगळवार शुक्रवार अमावस्या, पौर्णिमेला हजारो भाविक दाखल होतात मात्र या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याला कोणी वाली आहे का नाही? असा संतप्त सवाल भाविकांतून  उपस्थित केला जात आहे.

 श्री महालक्ष्मीची यात्रा अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपली आहे मात्र सद्यस्थितीमध्ये रस्ता दुरुस्तीच्या हालचाली दिसून येत नाहीत त्यामुळे याप्रकरणी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ लक्ष देऊन यात्रीपूर्वी रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांसह वाहनधारकातून जोर धरत आहे.

 चिवरी  येथील महालक्ष्मी दर्शनासाठी राज्यासह परराज्यातील भाविक मोठ्या संख्येने येतात मात्र मुख्य मार्ग नळदृग तुळजापूर रोडवरील चिवरी पाटी ते महालक्ष्मी मंदिर या तीन किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे, या रस्त्याने पायी चालणेही कठीण होऊन बसले आहे. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता?अशी अवस्था  झाली आहे. यामुळे वाहनधारक भाविकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. 

तुळजापूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने येथे शासकीय कामासाठी ग्रामस्थांना जावे लागते त्यामुळे या रस्त्यावर कायम वर्दळ असते या तीन किलोमीटरच्या रस्त्याचा प्रवास करण्यासाठी अर्धा तास वेळ लागत आहे. सद्यस्थितीमध्ये लक्ष्मी नगर ते झांबरे वस्ती पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला आहे मात्र झांबरे वस्ती ते महालक्ष्मी साठवण तलावापर्यंतचा संबंधित ठेकेदाराकडून अपूर्णच आहे  हा रस्ताही यात्रेपूर्वी होणे अपेक्षित आहे.  जागोजागी खड्डे पडल्याने वाहनेही खिळखळी होत आहेत. या रस्त्यावर अनेक दुचाकी घसरून पडण्याचे अपघातही घडले आहेत.  आणखीन मोठ्या अपघातांला प्रशासन आमंत्रण देत आहे की काय ? असा संतप्त सवाल भाविकांसह ग्रामस्थातून उपस्थित केला जात आहे . याप्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकारी लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत यांनी लक्ष देऊन रस्त्याची यात्रीपूर्वी तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी भाविकांसह, वाहनधारक, ग्रामस्थातून होत आहे.


Post a Comment

0 Comments