धाराशिव जिल्ह्यात जीबीएस आजाराबाबत आरोग्य यंत्रणा झाली सतर्क ;अशी घ्यावी दक्षता-GBS Virsus
धाराशिव,दि.१: राज्यात Guillain-Barré Syndrome (GBS) या दुर्मिळ आणि परिधीय मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या ऑटोइम्यून आजाराचे रुग्ण वाढत आहेत.त्यामुळे आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर असून,आरोग्य विभागाने नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
जीबीएस म्हणजे काय
जीबीएस हा शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे ट्रिगर होणारा आजार आहे. तो विशेषतः Campylobacter Jejuni, Influenza, Cytomegalovirus, Epstein-Barr आणि Zika सारख्या संसर्गांनंतर दिसून येतो. अतिसार किंवा श्वसन संसर्गानंतर काही रुग्णांना हा आजार जाणवतो.
जीबीएसच्या प्रमुख लक्षणांमध्ये पुढील बाबींचा समावेश होतो.
हात-पायातील अशक्तपणा व सुन्नपणा,मांसपेशींमध्ये वेदना व हालचालींवर परिणाम.श्वास घेण्यास अडथळा व थकवा.
हा आजार संसर्गजन्य नसला तरी काही गंभीर प्रकरणांमध्ये वेळेत उपचार न घेतल्यास जीवघेणा ठरू शकतो.मात्र,बहुतेक रुग्ण योग्य उपचारांमुळे पूर्णपणे बरे होतात. काही रुग्णांना दीर्घकालीन त्रास जाणवू शकतो.
काय करावे
पिण्याचे पाणी स्वच्छ आणि उकळलेले असावे.ताजे व पौष्टिक अन्न सेवन करावे.परिसर आणि वैयक्तिक स्वच्छता राखावी.कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जावे.
काय करू नये
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषधोपचार करू नयेत.आरोग्याशी संबंधित अफवांवर विश्वास ठेवू नये.
जीबीएस आजाराबाबत नागरिकांनी घाबरू नये,मात्र आवश्यक ती काळजी घ्यावी.कोणत्याही लक्षणांची जाणीव होताच विलंब न लावता वैद्यकीय मदत घ्यावी,असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनक घोष आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.एस. एल. हरिदास यांनी केले आहे.
0 Comments