महाकुंभ मेळाव्यात झालेल्या चेंगरा चेंगरीत ३०जणांचा मृत्यू, उत्तर प्रदेश पोलिसांची माहिती-
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा उत्सवाला गालबोट लागलं आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानसाठी संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला होता. यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीमध्ये ३० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी अधिकृत माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दिली आहे.
आज मौनी अमावस्या असल्याने नागा साधूंचा दुसरा अमृत स्नान विधी होणार होता. त्यामुळे मौनी अमावस्येच्या दिवशी सुमारे देशभरातून जवळपास 10 कोटी भाविक इथं जमल्याचं सांगितलं जात आहे. हे सर्व भाविक अमृत स्नान करण्यासाठी मुख्य संगम तिराच्या दिशेनं जात होते, त्यामुळे घटनास्थळी प्रचंड मोठी गर्दी जमली. गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने ढकलाढकली सुरु झाली. दरम्यान, गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी लावण्यात आलेले बॅरेकेडींग तुटले आणि चेंगराचेंगरी झाली. या घटनेत ३० जणांचा जीव गमावला. २५ लोकांनी ओळख पटलेली नाही. तर ९० जखमी भाविकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पहाटे १ ते २ वाजेच्या सुमारास गर्दी वाढली. त्यानंतर लोक बॅरिकेट तोडून दुसऱ्या बाजूला जात होती. त्यामुळे एकच गर्दी उसळली आणि त्यामुळे चेंगराचेंगरी झाली, अशी माहिती महाकुंभचे डीआयजी वैभव कृष्ण यांनी दिली.
चेंगराचेंगरीची घटना नेमकी कशी घडली?
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी यांनी सांगितलं की, “घडलेल्या घटनेने आम्हाला अतीव दुःख झालं आहे. हजारो भाविक आमच्यासोबत होते. लोकांच्या सुरक्षेसाठी आखाडे आज अमृत स्नानात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आला आहे. मी लोकांना आवाहन करतो की, आजच्या ऐवजी वसंत पंचमीला अमृत स्नान करा. अमृतस्नानासाठी प्रत्येक भाविकाला मुख्य संगम घाटावर पोहोचायचं होतं, यातूनच ही चेंगराचेंगरीची घटना घडली. त्यामुळे भाविकांनी संगम घाटावर येण्याऐवजी जिथे पवित्र गंगा दिसेल तिथेच स्नान करावे. ही प्रशासनाची चूक नाही. कोट्यवधी लोकांची गर्दी नियंत्रित करणं, सोपी गोष्ट नाही. आपण अधिकाऱ्यांना सहकार्य केले पाहिजे.”
0 Comments