चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याच्या निकृष्ट कामाची दुरुस्ती कधी होणार? गुत्तेदार मोकाट प्रशासनाचा कानाडोळा
तुळजापुर /राजगुरु साखरे : लाखो भक्ताचे श्रद्धास्थान असलेल्या चिवरी येथील महालक्ष्मी मंदिर रस्त्याची दुरुस्ती रामभरोसे सोडण्यात आली आहे. गुत्तीदाराने निकृष्ट दर्जाचे काम करून जबाबदारी झटकली असून प्रशासनही याकडे दुर्लक्ष करत असल्याने ग्रामस्थसह भाविकांमधुन तीव्र संताप व्यक्त होत आहे. यात्रेपूर्वी रस्ता दुरुस्त करण्याची तंबी संबंधित ठेकेदाराला संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग तुळजापूर येथील अधिकाऱ्यांनी दिली होती. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवत गुत्तेदार बिनधास्त बसला आहे. मागील दोन महिन्यांपूर्वी महालक्ष्मी मंदिराकडे जाणाऱ्या झांबरे वस्ती ते साठवण तलाव या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली. मात्र या कामात निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याने अल्पावधीतच रस्त्याची दयनीय अवस्था झाली. याप्रकरणी ग्रामस्थांनी तक्रार केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित यात्रेपूर्वी दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. मात्र यात्रा होऊन महिना उलटला तरी गुत्तेदारांनी दुरुस्तीच्या कामाला हातही लावला नाही. प्रत्यक्षात रस्त्याच्या फक्त साईट पट्ट्या भरून देखावा केला असून मुख्य रस्त्याची दुरावस्था जैसे थे आहे. याप्रकरणी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन हा रस्ता तात्काळ दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थसह भाविकांतून होत आहे
0 Comments