धाराशिव : प्रेम प्रकरणातून मारहाण झालेल्या माऊली गिरी या तरुणाचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू,
धाराशिव: भूम तालुक्यातील दुधोडी येथील १८ वर्षे वयाचा तरुण माऊली बाबासाहेब गिरी याचे पांढरेवाडी येथील एका विवाहित मुलीसोबत प्रेमसंबंध होते. सदरील मुलगी वडाचीवाडी येथे मामाकडे शिक्षणासाठी असल्यामुळे शाळेमध्ये असताना दोघांचे प्रेम प्रकरण जुळून आले होते. सदरील मुलीचे लग्न झाल्यानंतरही दोघांमध्ये प्रेम संबंध चालू होते. ३ मार्च रोजी व्हाट्सअपवरून दोघांमध्ये भेटण्याच्या संदर्भात संवाद झाला. मुलीच्या पतीने हा संवाद वाचला. त्याने मोबाईल ताब्यामध्ये घेऊन माऊली गिरी यास भेटण्यासाठी पांढरेवाडी येथे बोलावले. आल्यानंतर माऊलीस घरामध्ये कोंडून मुलीचे पती, वडील व अन्य चार ते पाच जणांनी विवस्त्र करून माऊली गिरी यास लोखंडी रोड, काठीने जबर मारहाण केली. त्यानंतर विवस्त्र अवस्थेत पांढरेवाडी येथील रस्त्यालगत फेकून दिले. केळेवाडीचे पोलीस पाटील यांनी माऊली गिरी याचे वडील बाबासाहेब गिरी यांना सदर घटनेची माहिती सांगितल्यानंतर गंभीर अवस्थेत माऊली याला जामखेड येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर होत असल्याने त्याला पुढील उपचारासाठी सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. 14 दिवसाच्या उपचारानंतरही किडनीवर व अन्य ठिकाणी जास्त मार लागल्यामुळे अखेर माऊली गिरी याने रविवारी सकाळी १०:३० वाजता अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून अद्याप सात आरोपी फरार आहेत.
0 Comments