धक्कादायक : छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात महिला कीर्तनकाराची आश्रमात दगडाने ठेचून हत्या
छत्रपती संभाजीनगर / प्रतिनिधी रुपेश डोलारे: वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात असलेल्या एका आश्रमात एका महिला कीर्तनकारचा मृतदेद आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या महिला कीर्तनकारची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची पोलीस तपासात उघड झाले. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला अटक झाल्यानंतरच हत्येमागचे कारण समोर येईल.
महाराज ह.भ.प. संगीताताई पवार, असे हत्या झालेल्या महिला किर्तनकाराचे नाव आहे. आश्रमात घुसून संगीताताई यांची हत्या करण्यात आल्याची बातमी समजताच वैजापूरसह संपूर्ण संभाजीनगरमध्ये खळबळ माजली. या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संगीताताई यांची हत्या का केली? या गुन्ह्यामागे कोण आहे? याचा पोलीस शोध घेत आहेत. आश्रमातील कर्मचारी आणि इतरांची चौकशी केली जात आहे. लवकरच या हत्येमागील गुन्हेगाराला अटक केली जाईल, असा विश्वास वैजापूर पोलिसांनी व्यक्त केला आहे.
संगीता पवार या मागील दोन महिन्यांपासून चिंचडगाव येथील सदगुरु नारायणगिरी कन्या आश्रमात वास्तव्यास होत्या. त्या अविवाहित असून, त्यांनी संन्यास स्वीकारला होता. परिसरात त्या कीर्तनकार म्हणून ओळखल्या जात होत्या आणि नियमितपणे कीर्तनाचे कार्यक्रम करत असत. दररोज रात्री त्या आश्रमातील आपल्या खोलीतच झोपत असत, परंतु बुधवारी रात्री त्या खोलीबाहेर झोपल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या या व्यक्तींनी संगीता पवार यांच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्यांची हत्या केली. यावेळी आश्रमाजवळील मोहटा देवी मंदिराची दानपेटीही चोरीला गेल्याचे उघडकीस आले. गुरुवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास मोहटा देवी मंदिराचे पुजारी शिवाजी चौधरी आश्रम परिसरात आले असता त्यांना आश्रमाचे गेट आणि कुलूप तोडलेले दिसले. आत प्रवेश केल्यानंतर त्यांना संगीता पवार रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी तातडीने गावकऱ्यांना आणि वैजापूर व विरगाव पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी श्वान पथकासह घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
0 Comments