शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांनी केली तुळजापूर तालुक्यातील नुकसान ग्रस्त खरीप पिकांची पाहणी.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- धाराशिव जिल्हयामध्ये मागील काही दिवसापासुन अतिवृष्टी झाल्यामुळे खरीप पेरणी झालेल्या क्षेत्रावरील सोयाबीन, उडीद, मुग, तुर ही सर्वच पिके बाधीत झाली आहेत. तुळजापूर तालुका देखील याला अपवाद नाही. या नुकसानीची आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांसमवेत तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा,काक्रंबावाडी येथे प्रत्यक्ष पाहणी केली. गावातील बऱ्याच घरांची पडझड झालेली आहे, अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत, पिके तर संपूर्णपणे हातातून जाण्याच्या मार्गावर आहेत. एवढं नुकसान होऊनही सरकारचा प्रतिनिधी देखील दुर्लक्ष करत असेल तर शेतकऱ्यांनी करायच काय असा प्रश्न पाटील यांनी उपस्थित केला आहे.तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, काक्रंबा वाडी गावातील शेतामध्ये पाणी साठुन राहिल्याने सोयाबीन, उडीद, मुग, तुर इत्यादी पिकांची वाढ खुंटली आहे. तसेच फुलगळ झालेली असून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. सोयाबीन पिकावर मुळकुज, मानकुज आणि शेंगकरपा अशा प्रकारच्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. सोयाबीन जरी दिसायला हिरवेगार दिसत असले तरी उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. त्यामुळे सर्वच पिकांचे 50 टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे. सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालेले असल्याने हाता तोंडाशी आलेला घास हिराऊन घेतल्याने शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये म्हणून अतिवृष्टीचे पंचनामे तात्काळ करावेत,शेतकऱ्यांचा अंत पाहू नये.एकाही शेतकऱ्यांचे नुकसान होऊन तो मदतीपासुन वंचित राहीला तर याची जबाबदारी सर्वस्वी या सरकारची व प्रशासनाची असणार आहे,असे आमदार कैलास पाटील यांनी सांगितले.याप्रसंगी काक्रंबा गावातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments