खासगीकरणाविरोधात दिली वीज कर्मचाऱ्यांची संपाची हाक
कृती समितीची वीज कंपनीसह शासनाला नोटीस
द्वारसभा तुळजापूर येथे संपन्न
तुळजापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे: दि,(२५) : वीज कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी ९ आक्टोबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करणार असल्याची नोटीस राज्य शासन व वीज कंपनीला राज्य वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी कृती समितीतर्फे देण्यात आली आहे. २३ सप्टेंबरपासून ९ ऑक्टोबरपर्यंत विविध मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे.
तिन्ही वीज कंपन्यात अनेक पद्धतीने सुरू असलेले खाजगीकरण, इतर धोरणात्मक विषय व पेन्शन लागू करण्याबाबत आंदोलनाची सूचना देण्यात आली आहे. दि. ४ जानेवारी २०२३ रोजी तिन्ही वीज कंपन्यांचे व्यवस्थापन व कृती समिती यांची संयुक्त बैठक सह्याद्री अतिथी गृह, मुंबई येथे झाली. या बैठकीमध्ये शासनातर्फे तिन्ही वीज कंपन्यांमध्ये कोणत्याही पद्धतीचे खाजगीकरण करण्यात येणार नाही असे ठोस आश्वासन दिल्याने कृती समितीने पुकारलेला दि. ४ जानेवारी २०२३ रोजीचा संप स्थगित करण्यात आला होता. परंतु तिन्ही वीज कंपन्यांचे प्रशासनाने विविध मार्गाने खाजगीकरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे. खाजगीकरण व इतर प्रलंबित विषयांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दि. ९ ऑक्टोबर २०२५ ला एक दिवसाचा संप करण्याचा निर्णय कृती समितीने घेतलेला आहे.
आंदोलनाचे असे आहेत टप्पे
दि. २४ सप्टेंबर रोजी झोन, सर्कल, वीज निर्मिती केंद्र व विभागीय कार्यालयासमोर द्वारसभा.
दि.२५ सप्टेंबर रोजी कार्यालयीन कामकाजासाठी तयार सर्व ग्रुप सोडणे.
दि. २९ सप्टेंबर रोजी सीमकार्ड जमा करणे.
दि. १ ऑक्टोबर रोजी झोन कार्यालयासमोर धरणे आंदोलन.
दि. ३ आक्टोबर रोजी झोन, मंडळ, विभाग कार्यालयासमोर द्वारसभा.
दि. ६ ऑक्टोबर रोजी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन.
दि. ७ आक्टोबर रोजी झोन, मंडळ, विभागासमोर द्वारसभा.
दि. ९ ऑक्टोबरला एक दिवसाचा संप.
या आहेत मागण्या
महावितरण कंपनीच्या कार्यक्षेत्रात समांतर वीज वितरण परवाना देण्यास विरोध, महावितरण कंपनीचे ३२९ उपकेंद्र कंत्राटी पद्धतीने चालविण्यास देण्यास विरोध, कामगार संघटनांना विश्वासात न घेता महावितरण कंपनीमध्ये एकतर्फी पणे करण्यात आलेली पुनर्रचनेला विरोध, महापारेषणमधील २०० कोटींवरील प्रकल्प टीबीसीबीद्वारे भांडवलदारांना देण्यास विरोध.
स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन, मागासवर्गीय संघटना वीज कामगार महासंघ, सर्बोर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशन, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस (इंटक), स्वाभिमानी वर्कर्स संघटना, तांत्रिक संघटना( 5059)आदी आंदोलनात सहभागी आहेत. यावेळी वैभव मगर बापू जगदे बी एस काळे, डी सुरवसे , शाम आभाचने, या सह कर्मचारी उपस्थित होते.

0 Comments