चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल-Kalanb Court -Lifetime punishment Wife murder Case

Hot Posts

6/recent/ticker-posts

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल-Kalanb Court -Lifetime punishment Wife murder Case

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या, पतीला जन्मठेप ,कळंब येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल-


धाराशिव प्रतिनिधी /रुपेश डोलारे: चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीची निर्घृण हत्या करणाऱ्या पतीला जन्मठेप आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. कळंब येथील जिल्हा व  अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. के. राजेभोसले यांनी सोमवारी दि,15 रोजी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. विठ्ठल आप्पा संगापुरे (वय ५७, रा. रांजणी, ता. कळंब) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ही धक्कादायक घटना १ मार्च २०२२ रोजी कळंब तालुक्यातील रांजणी येथील शेत गट क्रमांक १४० मधील एका पत्र्याच्या शेडमध्ये घडली होती. आरोपी विठ्ठल संगापुरे हा त्याची पत्नी मंगल संगापुरे हिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. गेल्या १५ दिवसांपासून त्याने तिला शेडच्या बाहेर जाण्यास किंवा कोणाशीही बोलण्यास मज्जाव केला होता. 'तुला जिवे ठार मारीन' अशी धमकी तो तिला सतत देत असे, त्यामुळे त्यांचा मोठा मुलगा बाळासाहेब हा रात्री आईसोबत झोपायला जात होता.मात्र, २८ फेब्रुवारी २०२२ च्या रात्री तो झोपण्यासाठी गेला नाही. हीच संधी साधून आरोपी विठ्ठलने रागाच्या भरात झोपेत असलेल्या पत्नी मंगल यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यांच्या हातावर आणि गळ्यावर गंभीर जखमा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी मयत मंगल यांचा मुलगा परमेश्वर संगापुरे याने शिराढोण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. विशेष म्हणजे, फिर्यादी परमेश्वर आणि त्याचा भाऊ बाळासाहेब हे दोघेही साक्षीदरम्यान फितूर झाले.

असे असतानाही, इतर साक्षीदार शकेला दगडू शेख व हाजू इस्माईल शेख यांची साक्ष, वैद्यकीय अहवाल, परिस्थितीजन्य पुरावे आणि अतिरिक्त सरकारी वकील ॲड. आशिष कुलकर्णी यांचा प्रभावी युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी विठ्ठल संगापुरे याला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा  ठोठावली आहे.

Post a Comment

0 Comments