विकृतीचा कळस : अज्ञात व्यक्तीकडून एक एकर द्राक्ष बागेवर तणनाशक फवारणी, लाखो रुपयाचे नुकसान शेतकऱ्यावर अस्मानी संकट बार्शी तालुक्यातील घटना-
सोलापूर/प्रतिनिधी रूपेश डोलारे : अज्ञात इसमाच्या कृत्याने शेतकऱ्याच्या स्वप्नाचा चुराडा झालाय. अज्ञात इसमाने बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात द्राक्षबाग उद्ध्वस्त केली आहे. शेतकरी महिलेचा काळीज पिळटवून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. कर्ज काढून द्राक्ष बाग फुलवली आणि अज्ञात इसमाने सर्व काही उध्वस्त केले आहे. जवळपास एक एकर द्राक्ष बागेवर विषारी औषध फवारणी केले आहे. त्यामुळे छाटणीला आलेली द्राक्षबाग वाया गेली आहे. ही घटना बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात घडली आहे.बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात घडलेल्या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.अनिता किरण बर्डे या परिश्रमी शेतकऱ्याच्या द्राक्षबागेवर अज्ञात इसमाने तणनाशक फवारल्याने संपूर्ण बाग उद्ध्वस्त झाली आहे. हाता-तोंडाशी आलेलं पीक गळून पडल्याने बर्डे कुटुंब हतबल झाले आहे.अनिता किरण बर्डे उध्वस्त झालेल्या द्राक्ष बागेत आक्रोश व्यक्त करत असल्याच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
अज्ञात इसमाने सुमारे 1 एकर द्राक्षबागेवर तणनाशक फवारल्याने 10 ते 12 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे. येत्या काही दिवसांत द्राक्ष बागेत छाटणीची तयारी सुरू होती, मात्र अचानक झालेल्या या घटनेने शेतकऱ्याचं सर्वस्व एका रात्रीत नष्ट झालं. द्राक्षाच्या घडांनी भरलेली बाग आज ओसाड पडलेली आहे, आणि प्रत्येक वेल बघताना किरण बर्डे यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होत आहेत. या घटनेमुळे शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला असून, अज्ञात इसमाविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, अजूनपर्यंत दोषी व्यक्तीचा मागमूस लागलेला नाही.
शेतकरी महिलेचे अश्रू अनावर
तळहाताच्या फोडाप्रमाणे वर्षभर जतन केलेल्या द्राक्ष बागेवर तन नाशक फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचे एका रात्रीमध्ये बागेचे होत्याचे नव्हते झाले आहे, त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात संपला आहे .येथील शेतकरी महिला अनिता बर्डे यांनी अक्षरशा हंबर्डा फोडत आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे मीडियाच्या माध्यमातून केली आहे.

0 Comments