अणदूर येथील सौ.मीराताई घुगे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
चार महिला बचत गटांच्या माध्यमातून ६५० महिला केल्या संघटित व बचत गटांच्या माध्यमातून अनेकांना दिला आधार.
"""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
पूरग्रस्त भागातील नागरिकांसाठी ही केले राशन किट वाटप.
""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""""
इटकळ (दिनेश सलगरे):- तुळजापुर तालुक्यातील अणदूर येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. मीराताई घुगे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद. गेल्या वीस वर्षांपासून मीराताई घुगे या सामाजिक कार्यात अग्रेसर असुन त्यांनी सर्व महिला एकत्र याव्यात या उद्देशाने बचत गटांच्या स्थापनेस सुरुवात केली ज्यामुळे महिलांना या बचत गटांच्या माध्यमातून छोटे मोठे उद्योग उभे करता येतील व ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करण्यास समर्थ ठरतील याच संकल्पनेतून त्यांनी यशोदा महिला बचत गट, यशश्री महिला बचत गट, सिध्दी महिला बचत गट व दुर्गा शक्ती महिला बचत गट सुरू केले व जवळपास ६५० महिला बचत गटांच्या माध्यमातून जोडल्या गेल्या याच गटातून त्यांनी महिलांना उद्योग व्यवसायासाठी आर्थिक मदत करण्यास प्रारंभ केला. अनेक महिलांना या गटामार्फत अडी अडचणी मध्ये मदत होऊ लागली विशेष करून निराधार महिलांना आर्थिक मदत करणे, गरजू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे आणि गरीब महिलांना त्यांच्या घरातील लग्न कार्यात कामाची मदत करणे आदी सामाजिक उपक्रम हे या महिला बचत गटांच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षांपासून निरंतर सुरू आहेत. सौ मीराताई घुगे यांनी दारूबंदी अभियानात ही सहभाग घेऊन गाव व्यसनमुक्त करण्याचा प्रयत्न केला तर शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करण्यासाठी प्रोत्साहित करणे व त्यांना सेंद्रिय शेतीचे महत्व पटवून देण्याचा ही सातत्याने प्रयत्न केला. आणि महिला बचत गटांच्या मासिक बैठकीत महिलांनी आपल्या कुटुंबाची आरोग्याची काळजी कशी घ्यावी व स्वच्छ्तेचे आपल्या जीवनात महत्त्व काय याचे ही मार्गदर्शन दर महिन्यास केले जाते. तसेच लहान मुलांसाठी बालसभा घेऊन त्यांना मोबाईल मुळे आपल्या आरोग्यावर डोळ्यावर होणाऱ्या परिणामाविषयी माहिती देत थोरा मोठ्यांशी कसे वागावे याचे संस्कार धडे ही या महिला बचत गटांच्या माध्यमातून सौ.मीराताई घुगे यांच्या पुढाकारातून दिले जाते. सौ. मीराताई घुगे यांच्या या निरपेक्ष अशा सामाजिक कार्यामुळेच निराधार विधवा अशा अनेक महिलांना आधार मिळाला असल्याने गाव परिसरातून निरपेक्ष सेवेतून कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या सौ.मीराताई घुगे यांचे कौतुक करीत अभिनंदन केले जात आहे.

0 Comments