धाराशिव ,कळंब , वाशी भूम तालुक्यात पुन्हा ढगफुटीसदृश पाऊस: सोयाबीन पीक उद्ध्वस्त, शेतीला तळ्याचे स्वरूप-
धाराशिव/ प्रतिनिधी रूपेश डोलारे: गेल्या आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर धाराशिव जिल्ह्याला मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार झोडपले. भूम, कळंब आणि वाशी तालुक्यात तुफान पाऊस झाला असून काही ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद झाली आहे. मांजरा नदी दुथडी भरून वाहत असल्याने मांजरा धरणातून १५ हजार क्युसेक वेगाने विसर्ग सुरू आहे. तेरणा नदीला पाणी आल्याने संजीतपूर गावचा संपर्क तुटला आहे.धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी भागात पावसाचा पुन्हा तडाका सुरू झालाय. जिल्ह्यातील भूम, वाशी आणि कळंब भागात रात्रभर जोरदार पाऊस पडलाय. भूम परिसरातील बाणगंगा आणि दुधना नद्या तुडुंब भरल्या असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलाय. कळंब तालुक्यातील खामसवाडी - मोहा रस्त्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्याने रस्ता बंद करण्यात आलाय तर बहुतांश ठिकाणी काढणीला आलेल्या सोयाबीन पिकांच मोठ नुकसान झालेय.
त्याचबरोबर धाराशिव तालुक्यातील वाघोली, येडशी, काजळा, सापनाई गावात आज, रविवारी दि,5 रोजी सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. ढगफुटीसदृश झालेल्या या पावसामुळे ओढे-नाले तुडुंब भरून वाहू लागले आणि पाण्याचा प्रचंड लोंढा थेट शेतात घुसला. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे सापनाई शिवारातील गट क्रमांक ६४ मधील सोयाबीनचे पीक शंभर टक्के नष्ट झाले असून, शेतातील सुपीक माती वाहून गेल्याने जमीन खरडून गेली आहे. यामुळे या परिसरातील शेतकरी संकटात सापडले आहेत.
या नैसर्गिक आपत्तीमुळे हवालदिल झालेल्या गावकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे. तहसीलदार आणि कृषी विभागाने घटनास्थळी येऊन त्वरित पंचनामे करावेत, तसेच आर्थिक मदत, पीकविमा भरपाई आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या पुनरुज्जीवनासाठी विशेष अनुदान द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रशासनाने परिस्थितीचा प्राथमिक आढावा घेतला असला तरी, शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांची नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीची तातडीने गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. या घटनेमुळे तालुक्यातील इतर शेतकऱ्यांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यातील कळंब, वाशी आणि भूम तालुक्यात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे. कळंब तालुक्यातील सहा महसूल मंडळापैकी इटकुर, मोहा, शिरढोण, गोविंदपूर या चार मंडळात अतिवृष्टी झाली असून वाशी तालुक्यातील वाशी मंडळालाही अतिवृष्टीने अक्षरशः झोडपून काढले आहे. भूम तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला आहे. ईट महसूल मंडळात पुन्हा अतिवृष्टी झाली आहे.
अनेक ठिकाणी नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून काही गावांचा संपर्क तुटल्याची माहिती मिळत आहे. नदीकाठच्या गावातील नागरिकांना आवाहन आहे की आपण सुरक्षित ठिकाणी थांबावे, पाण्याखाली गेलेल्या पुलावरून धोकादायकरित्या प्रवास करू नये.
आ.राणाजगजितसिंह पाटील.(तुळजापूर विधानसभा मतदारसंघ)

0 Comments