तुळजापूर तालुक्यात सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात शासकीय खरेदी अभावी कवडीमोल दराने विक्री व्यापाऱ्याकडून होतेय सर्रास लूट-
तुळजापूर/राजगुरु साखरे : संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्यात शासकीय हमीभाव खरेदी केंद्र अद्याप सुरू न झाल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे .अगोदरच अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे मेटाकोटीला आलेल्या शेतकऱ्यांना आता बाजारात व्यापाऱ्याकडून होणाऱ्या कवडीमोल दारातील खरेदीमुळे दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे तसेच शासनाच्या धोरणात्मक दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे.
यावर्षी शासनाने सोयाबीन साठी प्रति क्विंटल 5,328 इतका हमीभाव जाहीर केला आहे मात्र प्रत्यक्ष स्थानिक बाजारपेठेत व्यापारी केवळ तीन हजार ते 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीनचे खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रति क्विंटल मागे तब्बल 1200 ते 1500 रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे निसर्गाच्या आसमानी संकटानंतर बाजारातील या सुलतानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर हातात पैसा नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे शासनाने दिवाळीपूर्वी हमीभावाने सोयाबीन खरेदी सुरू केली असती तर सण साजरा करण्यासाठी थोडी आर्थिक मदत झाली असती मात्र खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यासमोर दिवाळी सण कसे साजरी करायची हा प्रश्न उभा ठाकला आहे.तेलंगणा सरकारच्या धरतीवर थेट बांधावर जाऊन हमीभावाने सोयाबीन खरेदी करण्याची मागणी शेतकऱ्यातून जोर धरू लागली आहे.
शासनाने भविष्यात खरेदी केंद्र सुरू केली तरी त्याचा खरा फायदा शेतकऱ्यांपेक्षा व्यापाऱ्यांनाच होणार आहे आर्थिक गरजे पोटी बहुतांश शेतकरी आपला माल कमी दरात व्यापाऱ्यांना विकून मोकळे होतील आणि नंतर हेच व्यापारी शासकीय केंद्रावर सोयाबीन विकून मोठा नफा कमवतील त्यामुळे शासनाचे धोरण शेतकरी हिताची आहे की व्यापारी हिताचे असाच संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे. तेव्हा त्वरित शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची व शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे.

0 Comments