तुळजापूर - इटकळ गावातील अवैध धंद्यांवर कारवाईची नागरिकांची मागणी
तुळजापूर /प्रतिनिधी रूपेश डोलारे : मौजे इटकळ (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथील नागरिकांनी गावातील वाढत्या अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवत पोलीस प्रशासनाकडे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. गावात उघडपणे चालणारे राजरोस दारू विक्रीचे प्रकार, गांजा–अफूचे सेवन, तसेच मटका यांसारखे अवैध अमली पदार्थांचे धंदे दिवसेंदिवस वाढत चालल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तुळजापूर–गागनगापूर महामार्गावरून दररोज हजारो भाविकांची ये–जा असते. या मार्गावर दारू पिऊन व अमली पदार्थांच्या प्रभावाखाली गोंधळ घालणाऱ्या व्यक्तींमुळे वातावरण दूषित होत असून स्त्रिया, मुली आणि शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या अवैध धंद्यांकडे स्थानिक पोलीस यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. योग्य देखरेख नसल्याने अशा बेकायदेशीर क्रियाकलापांना अधिकच चालना मिळत असल्याचे नागरिकांचे मत आहे.
इटकळ गावातील शांती, सुव्यवस्था आणि सुरक्षिततेचा प्रश्न धोक्यात येऊ नये म्हणून नागरिकांनी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांना निवेदन देत तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, "गावातील शांतता बिघडवणारे सर्व अवैध दारू विक्रेते, मटका चालवणारे व गांजा–अफू विकणाऱ्यांवर त्वरित बंदी आणून कठोर कायदेशीर कारवाई केली जावी. असे निवेदनात नमूद केले आहे.
त्याचबरोबर बहुजन रयत परिषद तुळजापूर तालुका अध्यक्ष दयानंद गायकवाड यांनीही ईटकळ येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असून त्याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे. अन्यथा बहुजन रयत परिषद महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष श्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला प्रदेशाध्यक्ष कोमलबाई ढोबळे- साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुकाध्यक्ष दयानंद गायकवाड यांनी मौजे इटकळ येथे रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या निवेदनावर रवींद्र भोसले केशव गायकवाड,बाळासाहेब गायकवाड, शशिकांत कोळी,दिनेश सलगरे ,अफसर शेख,नामदेव गायकवाड ,धनराज क्षीरसागर, राम बागडे,देवानंद बागडे,लकडे,मुजावर यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.




0 Comments