उमरगा नगर परिषद - 2025' च्या निवडणूक निकालाबाबत-ऍड. शीतल शामराव चव्हाण यांची प्रतिक्रिया-Umerga Nagarpalika Election News

Hot Posts

6/recent/ticker-posts

उमरगा नगर परिषद - 2025' च्या निवडणूक निकालाबाबत-ऍड. शीतल शामराव चव्हाण यांची प्रतिक्रिया-Umerga Nagarpalika Election News

'उमरगा नगर परिषद - 2025' च्या निवडणूक निकालाबाबत-ऍड. शीतल शामराव चव्हाण  यांची प्रतिक्रिया-


उमरगा नगर परिषद निवडणूक अतिशय शांततेत पार पडली. तिचे निकालदेखील काल जाहीर झाले. एका घरगुती कार्यक्रमामुळे या निवडणूकीत पूर्णवेळ काम करता आले नसले तरी मी माझ्या भूमिका जाहीर सभांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. बऱ्याचवेळा 'निवडणूकीपूरते राजकारण' असे म्हंटले जाते. पण सभांच्या माध्यमातून मी मांडलेले मुद्दे व उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ निवडणूकीपुरते मर्यादित नाहीत तर ते उमरगा शहर व परिसराच्या सार्वजनिक आरोग्याशी निगडित असलेले महत्वाचे विषय होते व आहेत, हे स्पष्ट होणे आवश्यक आहे.

या निवडणूकीत आम्ही ज्यांचे समर्थन केले त्यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यामूळे या पराभवाची जबाबदारी आमच्यावरदेखील येते. ती स्वीकारून त्याची कारणे शोधणे हे काम जरूर करू. लोकशाहीत निवडणूका सर्वांनाच आत्मचिंतन करायला भाग पाडतात. ज्याप्रमाणे पराभूत झालेल्यांना आपण पराभूत का झालो याचे आत्मचिंतन करावे लागते, त्याप्रमाणे विजयी झालेल्यांनादेखील आपल्याला या विजयासाठी काय-काय करावे लागले आणि ते का करावे लागले, याचे आत्मचिंतन करणे आवश्यक असते. निवडणूका प्रस्थापितांच्या ताब्यात गेल्याने आणि प्रस्थापितांमध्ये लागलेल्या चूरशीला प्रतिष्ठा प्राप्त झाल्याने निवडणूकीने जे अतिखर्चिक रूप धारण केले आहे, त्याचादेखील गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. या निवडणूकीत झालेल्या खर्चाचा खरा आकडा पुढे आल्यास यापुढे सर्वसामान्यांनी निवडणूकीत उतरण्याचे स्वप्नसुद्धा बघू नये अशी परिस्थिती आहे. उमरगा भागातील सर्वपक्षीय सौहार्दाचे कौतुक होत असताना, निवडणूका सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याच्या संकटावरदेखील सर्वपक्षीय चर्चा व कृती होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

या निवडणूकीत जय-पराजयाचा विचार न करता, समोर बलाढ्य शक्ती एकत्र आलेल्या असतानादेखील विचारांशी, तत्वाशी तडजोड न करता, आमच्या आधीच्या भूमिकांशी सुसंगत राहून यथाशक्ती काम करू शकलो याचा मनस्वी आनंद आहे. 

आमची वाचन चळवळ, लोकांच्या भावनेला वाचा फोडण्याच्या कामातून निर्माण झालेले सामाजिक संघटन हे छोटेसे असले तरी त्याचे स्वतंत्र व निवडणूकीच्या राजकारणाच्या पलीकडील अस्तित्व आहे. ते अबाधित ठेवून पुढील काळातही अविरतपणे काम करीत राहू.

सर्व विजयी उमेदवारांचे मनस्वी अभिनंदन. त्यांनी चांगले काम करावे यासाठी सदिच्छा. त्यांच्या कौतुकाला कार्यकर्त्यांचा ताफा सज्ज आहेच. पण चुकल्यावर जाणीव करून द्यायला आम्ही सज्ज राहू. 

या निवडणूकीत नोटा, अपक्ष, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना - उबाठा,  राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरद पवार), राष्ट्रवादी कॉँग्रेस (अजित पवार), भारतीय जनता पक्ष, भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेस आणि शिवसेना - शिंदे गट अशा सर्वांना मतदान करून आपला लोकशाहीचा हक्क बजावणाऱ्या सर्व मतदारांचे मनस्वी आभार. 

जय संविधान, जय भारत!

© ऍड. शीतल शामराव चव्हाण 

(मो. 9921657346)

Post a Comment

0 Comments