श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबिराचा उत्साहात समारोप-Shripatrav Bhosle High School Dharashiv
धाराशिव : श्रीपतराव भोसले ज्युनिअर कॉलेज, धाराशिव येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने मौजे सिद्धेश्वर वडगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष हिवाळी शिबिराचा दिनांक २१ जानेवारी रोजी यशस्वी समारोप झाला. शिबिराच्या कालावधीत शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी शैक्षणिक, सामाजिक, आरोग्यविषयक, पर्यावरणपूरक व जनजागृतीपर विविध उपक्रम राबवून ग्रामविकास व सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.
या शिबिरात ग्रामस्वच्छता, रस्ते स्वच्छता, मंदिर व समाजमंदिर सफाई, बस स्थानक परिसर स्वच्छता, गाजर गवत निर्मूलन, वृक्षारोपण, वृक्षांना आळे करणे, शोषखड्डे बांधकाम, गटार दुरुस्ती तसेच जलसंधारणासाठी ‘पाणी आडवा, पाणी जिरवा’ या उपक्रमांतर्गत विविध कामे करण्यात आली. शिबिरार्थींनी तंबाखू, गुटखा व प्लास्टिकजन्य पदार्थांचे पाकीट गोळा करून परिसर स्वच्छ केला व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तसेच धाराशिव फाउंडेशन निर्मित सिद्धेश्वर देवराईस भेट देऊन वृक्षारोपण करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्राची साफसफाई करून विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदारीचे भान जपले.
शिबिरादरम्यान एड्स जनजागृती, बालविवाह प्रतिबंध, अंधश्रद्धा निर्मूलन, हागणदारी मुक्त गाव जनजागृती, दारूबंदी विषयक संवाद व विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली. प्रसिद्ध योग अभ्यासक व ‘आर्ट ऑफ लिविंग’चे जिल्हा समन्वयक श्री. लक्ष्मण काकडे यांनी अध्यात्म, चिंतन, चेतना व ध्यान यावर प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. तसेच योग अभ्यासक कुमारी अंजली साळुंखे यांनी शिबिरार्थी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना योगासने व सूर्यनमस्काराचे प्रशिक्षण दिले.
एका विशेष कार्यक्रमात “आजचा युवक व ध्येयवाद” या विषयावर प्राध्यापक डी. व्ही. जाधव यांनी प्रभावी व्याख्यान दिले. त्यांनी आचार्य दादा धर्माधिकारी यांनी सांगितलेल्या तारुण्याच्या तीन ‘त’कारांचा उल्लेख करून युवकांनी समाजोपयोगी कार्यासाठी आपले तारुण्य वापरावे, अडचणींवर मात करावी व स्पष्ट ध्येय ठेवून सातत्याने प्रयत्न करावेत, असा प्रेरणादायी संदेश दिला. यावेळी प्रा. डी. वाय. घोडके यांनी एनएसएस विभागाच्या १४ वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेत विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणारी शिस्त, सेवाभाव, नेतृत्वगुण व सामाजिक जाणीव याबाबत अनुभव कथन केले.
शिबिरात पक्षीप्रेमी व मराठी विषयाचे अभ्यासक डॉ. मनोज डोलारे यांनी वन्यजीव संरक्षण या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच के. टी. पाटील फाउंडेशन वर्गाचे प्रमुख श्री. विनोद आंबेवाडीकर यांनी प्लास्टिक वापराचे वाढते दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना जागरूक केले. काव्यवाचन सत्रात श्री. यशवंत कोकाटे यांनी राष्ट्रमाता व समाजसुधारकांवर आधारित कविता सादर केल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. श्री. एस. व्ही. पाटील यांनी केले तर सहकार्यक्रमाधिकारी श्री. आर. एस. भोसले यांनी आभार मानले. शिबिरात सहकार्यक्रमाधिकारी मेघमाला देशमुख, अनिता तुंगीकर आदींची उपस्थिती लाभली. शिबिरासाठी कॉलेजचे प्राचार्य श्री. एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य श्री. एस. के. घार्गे, कला-वाणिज्य पर्यवेक्षक श्री. के. के. कोरके, विज्ञान पर्यवेक्षक श्री. एम. व्ही. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
संस्थाध्यक्ष श्री. सुधीर अण्णा पाटील, सरचिटणीस सौ. प्रेमाताई पाटील, संस्थेचे सीईओ श्री. आदित्य पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. एस. एस. देशमुख आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.या विशेष हिवाळी शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये ध्येयवादी विचार, आत्मविश्वास, सामाजिक जाणीव व सेवाभाव वृत्ती वाढीस लागल्याचे दिसून आले.

0 Comments