महाकाली कला केंद्रात धाडसी दरोडा; तरुणास मारहाण, कोयता-तलवारीने हल्ला — लाखोंचा ऐवज लंपास-Mahakali kala kendra Yermala
धाराशिव (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात रविवारी (दि. 11 एप्रिल 2026) सायंकाळी एक धक्कादायक घटना घडली. काही आरोपींनी एकत्र येत गैरकायद्याची मंडळी जमवून केंद्रात घुसखोरी करत तरुणावर मारहाण केली तसेच धारदार शस्त्रांनी हल्ला करून लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे.
याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपींमध्ये सुनिल शेळके, जयंत भोसले, नगेश लोखंडे, हनुमंत शेळके, योगेश चव्हाण, दिनेश चव्हाण, सोनू पवार तसेच इतर सात अनोळखी इसमांचा समावेश आहे. सर्व आरोपी हे येडशी (ता. धाराशिव) येथील असल्याची माहिती मिळाली आहे.
फिर्यादी कशीश राजेश शेरकर (वय 20, रा. इंगळे गल्ली, धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी महाकाली कला केंद्रात जबरदस्तीने प्रवेश करून शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच केंद्रातील कामगार महादेव पवार यांच्यावर कोयता व तलवारीने हल्ला करून गंभीर जखमी केले.
यावेळी आरोपींनी फिर्यादीस जीवे ठार मारण्याची धमकी देत रोख रक्कम सुमारे 2 लाख रुपये, तसेच पाच तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, 12 ग्रॅम सोन्याची कानातील साखळी असा मौल्यवान दागिना लंपास केला. याशिवाय टीव्ही, फ्रिज, एसी, कपाट, 70 खुर्च्या, 3 पाण्याच्या टाक्या, 10 जार, 3 सीसीटीव्ही कॅमेरे व घरगुती भांडी असा एकूण सुमारे 5 लाख 10 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेण्यात आला.
तसेच आरोपींनी वाहनांची तोडफोड करून सुमारे 3 लाख रुपयांचे नुकसान केले आहे.
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. येरमाळा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 333,119(1),118(1),115(2),352,351(2),351(3)324(5)191(2),191(3) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. येरमाळा येथील पीएसआय स्वप्नील भोजगुडे हे याचा तपास करीत आहेत.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी कला केंद्र व तिथे कलेच्या नावावर चालणाऱ्या बाबीवर ठोस भुमिका घेतली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तुळजाई, पिंजरा, साई, गौरी व कालिका असे 5 केंद्राचे परवाने जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी कायमस्वरूपी रद्द केले असुन महाकाली हे एकमेव कला केंद्र सुरु आहे मात्र तिथे हाणामारीसह अनेक घटना घडल्या आहेत. महसूल व पोलिस विभागाच्या पाहणी अहवाल व शिफारशी नंतर कायदा आणि सुव्यवस्था, अनेक तक्रारीच्या अनुषंगाने हे कला केंद्रचा परवाना स्थगित केला आहे तरीही हे सुरु आहे. कला केंद्र चालु ठेवल्यामुळे कायदा व सुव्यवस्थाविषयक प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी राजाभाऊ सीताराम माळी यांच्यावर असेल असे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या आदेशात नमुद आहे.

0 Comments