/> class='adsbygoogle' data-ad-client='ca-pub-7797085685451885' data-ad-format='fluid' data-ad-layout='in-article' data-ad-slot='7304658765' style='display:block; text-align:center;'/> जमीन वादातून रक्तरंजित हत्याकांड; एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांची निर्घृण हत्या!-Land Matter Murder Crime News

Hot Posts

जमीन वादातून रक्तरंजित हत्याकांड; एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांची निर्घृण हत्या!-Land Matter Murder Crime News

जमीन वादातून रक्तरंजित हत्याकांड; एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांची निर्घृण हत्या!-Land Matter Murder Crime News 

कर्नाटकातील विजापूर जिल्हा हादरला; खिलार बैलांचे संगोपन करणाऱ्या ‘निराळे सावकार’ कुटुंबावर जीवघेणा हल्ला

विजापूर (कर्नाटक), दि. ३० मे – जमीन वादातून सुरू झालेल्या संघर्षाने शुक्रवारी भीषण व रक्तरंजित वळण घेत कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील चडचण परिसर हादरवून सोडला. गोविंदपुरा गावाजवळील शेतात झालेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जणांसह सहा जणांची निर्घृण हत्या करण्यात आली, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर खिलार बैलांचे संगोपन करणारे आणि ‘निराळे सावकार’ म्हणून परिचित असलेल्या कुटुंबावर हा जीवघेणा हल्ला झाला.

जमिनीच्या वादातून उफाळला रक्तरंजित संघर्ष

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोविंदपुरा गावातील अनेक वर्षांपासून वादग्रस्त असलेली जमीन काही महिन्यांपूर्वी चडचण येथील निराळे कुटुंबाने खरेदी केली होती. स्थानिक ग्रामस्थांनी ही जमीन खरेदी करू नये, असा सल्ला दिला होता. मात्र, जमीन खरेदी केल्यानंतर तिची साफसफाई व काटेरी झुडपे काढण्यासाठी निराळे कुटुंबातील सदस्य शुक्रवारी शेतात गेले होते.

यावेळी संबंधित जमीन वादातील दुसऱ्या गटातील लोक तेथे पोहोचले. दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी झाली. काही वेळातच हा वाद हाणामारीत बदलला आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली.

डोळ्यात मिरची पूड, गोळीबार आणि कोयत्यांनी सपासप वार

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी प्रथम निराळे कुटुंबीयांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. त्यानंतर गोळीबार करत धारदार शस्त्रे, कोयते आणि कुर्‍हाडींसारख्या हत्यारांनी बेछूट हल्ला चढविला. अनेकांच्या डोक्यावर, मानेवर आणि शरीरावर गंभीर वार करण्यात आले.

हल्ला इतका क्रूर होता की शेताच्या रस्त्यावर आणि शिवारात काही अंतरावरच मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसून आले.

सहा जणांचा मृत्यू, एक गंभीर जखमी

या हल्ल्यात खालील व्यक्तींचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे –

  • रेवणसिद्धप्पा निराळे
  • गुंडप्पा रेवणसिद्ध निराळे
  • शिवपुत्र रेवणसिद्ध निराळे
  • चंद्रशेखर (चंदू) निराळे
  • शब्बीर नदाफ अत्तार
  • आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती

तर अरविंद बंडगर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर चडचण येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विशेष म्हणजे, मृतांमध्ये चडचण नगरपंचायतीचे सदस्य चेतन निराळे यांच्या कुटुंबातील सदस्यांचाही समावेश आहे.

हल्लेखोर महाराष्ट्राच्या दिशेने पसार?

घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले असून ते महाराष्ट्राच्या दिशेने पळून गेल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक व महाराष्ट्र पोलिसांनी सीमावर्ती भागात सतर्कता वाढविली आहे.

घटना समजताच विजापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक (SP) आणि वरिष्ठ अधिकारी मोठ्या पोलीस बंदोबस्तासह घटनास्थळी दाखल झाले. चडचण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर सुरू आहे.

‘निराळे सावकार’ म्हणून होती ओळख

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर निराळे कुटुंब ‘निराळे सावकार’ म्हणून प्रसिद्ध होते. खिलार जातीच्या बैलांच्या संगोपनासाठी त्यांची विशेष ओळख होती. त्यांनी सुरू केलेल्या खिलार बैलांच्या प्रदर्शन आणि यात्रांना महाराष्ट्र व कर्नाटकातील शेकडो शेतकरी उपस्थित राहत असत.

खिलार बैलांच्या उत्तम संगोपनामुळे आणि पशुपालन क्षेत्रातील योगदानामुळे निराळे कुटुंबाची कृषी क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण झाली होती. त्यामुळे या कुटुंबावर झालेल्या भीषण हल्ल्याने दोन्ही राज्यांतील शेतकरी वर्गात हळहळ व्यक्त होत आहे.

परिसरात तणावपूर्ण शांतता

सहा जणांच्या हत्येमुळे चडचण आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत पंचनामा, पुरावे संकलन आणि आरोपींचा शोध सुरू होता.

जमिनीच्या वादातून घडलेल्या या सामूहिक हत्याकांडाने संपूर्ण कर्नाटक-महाराष्ट्र सीमा परिसर हादरून गेला असून, आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments