बसस्थानकावरून फूस लावून नेले; बळजबरीने लग्न करून तरुणीकडे लैंगिक अत्याचार, आरोपीविरुद्ध ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल-
धाराशिव , प्रतिनिधी :
लोहारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील तरुणीला पैसे देण्याचे आमिष दाखवून बसस्थानकावरून मोटरसायकलवर घेऊन जात बळजबरीने लग्न केल्याचा आणि त्यानंतर धमकावत तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून संबंधित तरुणाविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता (नाव व गाव गोपनीय) हिला दि. 03 जून 2026 रोजी दुपारी सुमारे 12.30 वाजण्याच्या सुमारास एका तरुणाने बसस्थानक परिसरातून “पैसे घेऊन देतो” असे सांगून मोटरसायकलवर बसवून नेले. त्यानंतर तिची इच्छा नसताना बळजबरीने लग्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, आरोपीने पीडितेला मारहाण करत तिच्या गालावर चापट मारली आणि “माझ्यासोबत राहिली नाहीस तर तुला ठार मारीन किंवा तुझ्या नावाची चिठ्ठी लिहून स्वतःला काहीतरी करेन” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
याशिवाय, आरोपीने पीडितेच्या घरासमोर रस्त्यावर उभे राहून जातीवाचक शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी पीडितेने दि. 11 जून 2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरावरून लोहारा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 115(2), 352, 351(2)(3) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम 3(1)(w), 3(2)(v), 3(1)(r), 3(1)(s) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.

0 Comments